
सामना ऑनलाईन। मुंबई
देसी गर्ल प्रियांका आणि निक यांच्या शाही लग्नसोहळ्यास सुरुवात झाली असून इतरांपेक्षा हे लग्न ‘हटके’ ठरण्यासाठी खास कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. यात हिंदुस्थानी संगीताबरोबरच पाश्चात्य गाण्यांची रेलचेल असणार आहे. पण त्याचदरम्यान या लग्नात वधुपक्ष विरुद्ध वरपक्ष असा क्रिकेटचा एकदिवसीय सामनाही रंगणार असल्याचे समजते. आज शनिवारी हा सामना उमेद भवन पॅलेसवर खेळला जाणार आहे.
सासाठी दोन टीम बनवण्यात आल्या असून प्रियांकाच्या टीमला ‘P’ असे नाव देण्यात अले असून निकच्या टीमचे नाव ‘N’असे आहे. सामन्यादरम्यान हे जोडपं आपआपल्या टीमला चियर करण्याचं काम करणार आहेत. या लग्नसोहळ्यासाठी उमेद भवनमधील कर्मचारी व पाहुण्यांना एक नियमावली देण्यात आली आहे. त्यात पाहुणे व कर्मचाऱ्यांना लग्नस्थळी कॅमेरा असलेला फोन घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच या लग्नाला येणारे सर्व पाहुणे हे व्हीव्हीआयपी असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये, त्यांची कामे अडकू नयेत म्हणून त्यांना या सोहळ्यापुरता एक कॅमेरा नसलेला साधा फोन वापरण्यास देण्यात येणार आहे.
दरम्यान, शुक्रवारी प्रियांका-निकचा संगीत कार्यक्रम होता. यावेळी रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी सहकुटुंब आले होते. तसेच सलमान खानची बहिण अर्पिता आणि अनेक सेलिब्रिटीज या संगीत कार्यक्रमात सहभागी झाले होते. उद्या २ डिसेंबरला प्रियांका- निकचा विवाह होणार आहे. प्रियांका -निक हिंदू व ख्रिश्चन पद्धतीने लग्न करणार आहेत.



























































