डेटिंग ऍप्स पडले महागात, सेक्सटॉशन करून 4 लाख 68 हजार रुपये उकळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डेटिंग ऍप्सवरची मैत्री युवकाला महागात पडली आहे. ठगाने सेक्सटॉशन करून युवकांकडून 4 लाख 68 हजार रुपये उकळले. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

युवक हा भांडुप येथे राहत असून सध्या एमबीएचे शिक्षण घेत आहे. गेल्या महिन्यात त्याने सिंगल डेटिंग ऍप्स मोबाईलमध्ये डाऊनलोड केले होते. ऍप्स डाऊनलोड केल्यावर एका मुलीने युवकाला मेसेज पाठवला. मेसेज पाठवल्यानंतर त्या दोघांनी ऐकमेकांचे नंबर शेअर केले. नंबर शेअर केल्यावर एका तरुणीने युवकाला व्हिडीओ कॉल केला. व्हिडीओ कॉल उचलल्यावर एक तरुणी अश्लील कृत्य करत होती. युवकाने तो कॉल कट केला. कॉल कट केल्यावर काही वेळाने ठगाने युवकाला मोबाईलवर मेसेज पाठवून ती क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करू का, अशी धमकी दिली. जर पैसे दिले नाही तर ती क्लिप व्हायरल करून नातेवाईकांना पाठवू, असे युवकाला सांगितले.

दहा दिवसांपूर्वी युवकाला एका नंबरवरून फोन आला. कॉलेजमध्ये असल्याने युवकाने तो फोन उचलला नाही. ठगाने युवकाला व्हॉइस मेसेज पाठवून आपण यूटय़ूबवरून बोलतोय असे भासवून तुमचा एक व्हिडीओ यूटय़ूबवर अपलोड होत असल्याचे भासवले. बदनामी टाळायची असल्यास पैसे लागतील. पाचशे रुपये चार्जेस आणि व्हिडीओ डीलिट झाल्यावर पाच हजार रुपये पुन्हा खात्यात पाठवू अशा भूलथापा मारल्या. भीतीपोटी युवकाने पैसे पाठवले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवकाने भांडुप पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पैसे रिफंडच्या मारल्या भूलथापा

सुरुवातीला पैसे पाठवल्यानंतर आणखी एका ठगाने युवकाला फोन केला. त्याने आपण यूटय़ुबचे आयटी इंजिनीअर असल्याचे भासवून तुमची केस सायबरला जाणार आहे, असे सांगून पैशाची मागणी केली. तसेच रिफंडचे पैसे अमेरिकेतून येणार असल्याचे भासवत 4 लाख 67 हजार रुपये उकळले.