
गोरेगावच्या फिल्मसिटी अर्थात दादासाहेब फाळके चित्रनगरीत चक्क मुंबई लोकल अवतरलीय. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमध्ये घडणारी रंजक कहाणी नीलेश राठी निर्मित आगामी ‘मुंबई लोकल’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यानिमित्ताने कला दिग्दर्शक सुमित पाटील याने इकोफ्रेंडली साहित्याचा वापर करून अवघ्या चार दिवसांत ही लोकल ट्रेनची हुबेहूब प्रतिकृती उभारली. चित्रपटाच्या कथानकाच्या गरजेनुसार सुमितने 2000 सालातील लोकलचा महिलांचा डबा तसेच मालडबा तयार केला असून त्या काळातील लोकलची रंगसंगती, आसनांची व्यवस्था, पंखे, टय़ुबलाईट इतकेच नव्हे तर जुन्या जाहिराती या गोष्टी त्याने जशाच्या तशा उभारल्या आहेत. ही लोकल पाहून अनेकजण आपल्या जुन्या आठवणींमध्ये रमत आहेत.
























































