चेंबूर हिंसाचार प्रकरण; हायकोर्टाची नेहरू नगर पोलिसांना नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध न लागल्यामुळे वडिलांनी आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे चेंबूरमध्ये उसळलेल्या हिंसाचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी कुर्ला, नेहरू नगर पोलिसांना नोटीस बजावली आहे.

आठ महिन्यांपूर्वी ठक्कर बाप्पा कॉलनीतील पंचाराम रिथाडिया यांची 17 वर्षांची मुलगी हरवली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करूनही आपली मुलगी सापडत नसल्याने पंचाराम यांनी आत्महत्या केली. पंचाराम यांच्या अंत्ययात्रेवेळी तेव्हा संतप्त जमावाने बाप्पा उमरशी चौक येथे रास्ता रोको करत शीव-पनवेल महामार्ग रोखला. जमावाने पोलिसांवरही हल्ला केला. पोलिसांनी आपल्या मुलीचा शोध घेतला नाही तसेच या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात यावा व आपल्या मुलीचा छडा लागावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात मुलीची आई मंजुदेवी रिथाडिया हिने ऍड. नितीन सातपुते यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. हायकोर्टाने याप्रकरणी नेहरू नगर पोलिसांना नोटीस बजावली व सुनावणी 2 डिसेंबरपर्यंत तहकूब केली.