
सामना ऑनलाईन | मुंबई
रेल्वेच्या तांत्रिक कामांसाठी रविवारी मध्य, हार्बर आणि पश्चिम या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेमार्गावर माटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्ग, हार्बर मार्गावर वडाळा ते मानखुर्दच्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवरील सांताक्रुझ ते माहीमदरम्यान अप धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
ब्लॉकच्या काळात हार्बरवरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉकच्या काळात मध्य रेल्वेच्या मुख्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल उशिराने धावणार आहेत.मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड डाउन जलद मार्गावर सकाळी 10 : 30 ते दुपारी 3:00 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाउन दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते माहीमदरम्यान अप धिम्या मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सांताक्रुझ ते माहीमदरम्यान लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर वडाळा ते मानखुर्दच्या अप आणि डाउन दोन्ही मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. वाशी, बेलापूर, पनवेल, दरम्यानच्या दोन्ही मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल ते मानखुर्द दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.





























































