
वरळी येथील टिळक रुग्णालयाबाहेरील फुटपाथवर 11 स्टॉल्स उभारण्यास परवानगी देण्याच्या मुंबई पालिकेच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाने तीव्र नाराजीचा सूर आळवला. फुटपाथच्या मध्यावर स्टॉल्स उभारण्यास परवानगी देऊन पालिकेने पादचारी सुरक्षा व जनहिताच्या मूळ उद्देशालाच धक्का दिला आहे. पालिकेची भूमिका प्रथमदर्शनी जनहितविरोधी आहे, असे मत व्यक्त करीत न्यायालयाने स्टॉल्सना परवानगी देण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे आदेश पालिकेला दिले.
महापालिकेने गेल्या वर्षी टिळक रुग्णालयाच्या बाहेर असलेल्या फुटपाथवर 11 स्टॉल्स उभारण्यास परवानगी दिली. त्या निर्णयाला आव्हान देत टिळक रुग्णालय चालवणाऱया ‘द बॉम्बे मदर्स अॅण्ड चिल्ड्रन वेल्फेअर सोसायटी’ने उच्च न्यायालयात धाव घेतली. सोसायटीच्या याचिकेवर न्यायमूर्ती सुनील शुव्रे आणि न्यायमूर्ती एम. डब्ल्यू .चांदवानी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी सोसायटीतर्फे अॅड. सतीश बोरूलकर आणि अॅड. सिद्धेश बोरुळकर यांनी पालिकेच्या धोरणावर जोरदार आक्षेप घेतला. त्याची गंभीर दखल घेत खंडपीठाने पालिकेच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. फुटपाथ हा पादचाऱयांना सुरक्षितरीत्या चालण्यासाठी असतो. याच फुटपाथवर स्टॉल्स उभारणीस परवानगी देऊन पालिका प्रशासन फुटपाथच्या मूळ उद्देशाला धक्का देत आहे. वास्तविक, रुग्णालये, शाळा-महाविद्यालये व प्रार्थनास्थळांच्या 100 मीटर परिसरात फेरीवाल्यांना मनाई आहे. असे असतानाही रुग्णालयाच्या बाहेर स्टॉल्स उभारण्यास पालिकेने परवानगी कशी काय दिली, असा संतप्त सवाल खंडपीठाने केला. यावेळी पालिकेने आपल्या निर्णयाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. 100 मीटर परिसरातील मनाई ही फेरीवाल्यांना लागू आहे, स्टॉल्सना नाही, असा दावा पालिकेतर्फे अॅड. अनुप पाटील यांनी केला. दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर खंडपीठाने पालिकेला फुटपाथवर स्टॉल्स उभारण्यास दिलेल्या परवानगीच्या पुनर्विचाराचे आदेश दिले.
न्यायालय काय म्हणाले?
- फुटपाथ पादचाऱयांसाठी आहेत, व्यवसायासाठी नाहीत. फुटपाथवर स्टॉल उभारण्याची परवानगी देणे म्हणजे पालिका प्रथमदर्शनी सार्वजनिक हिताच्या विरोधात काम करत आहे. फुटपाथवरील स्टॉल्समुळे पादचाऱयांना अडथळा निर्माण होतो. परिणामी पादचाऱयांना चालण्यासाठी रस्त्याचा वापर करावा लागतो. त्यामुळे पादचारी जिवाला धोका निर्माण होतो.
- पादचाऱयांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणे तसेच गाडय़ांची रहदारी सुरळीतपणे होऊ देणे हा फुटपाथ बांधण्याचा मूळ उद्देश आहे. या उद्देशाला पालिका धक्का देत आहे.
























































