
सामना प्रतिनिधी। मुंबई
ईव्हीएम मशीन आणि त्यांच्या संख्येबाबत माझ्या मनात फार आधीपासून शंका होती. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड इथे भाजपची सत्ता असताना भाजपचा पराभव झाला आणि काँग्रेस विजयी झाली. पण कदाचित हा पराभव देशाची निवडणूक जिंकण्यासाठी तर नाही, असे मत व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीतील ईव्हीएम मशीनच्या वापराबाबत शंका उपस्थित केली आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱयांची बैठक शनिवारी मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर पवार यांनी ‘फेसबुक’ आणि ‘ट्विटर’वर पोस्ट करत निवडणुकीतील ईव्हीएम वापराबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी ज्या तीन राज्यांत भाजपचा पराभव करत काँग्रेसने सत्ता मिळवली. आता त्याच राज्यांत भाजपला घवघवीत यश मिळाल्याकडे लक्ष वेधत ईव्हीएमच्या वापराबाबत पवार यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणूक यंत्रणेबाबत निवडणुकीत कधी नव्हे तितका विचार करण्यात आला. माझे मत हे बरोबर गेले आहे की नाही त्याबाबत लोकांना शंका वाटत आहे. देशात लोकांच्या मनात अशी शंका याआधी कधी निर्माण झाली नव्हती. आजही लोकांची शंका कायम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड ही तिन्ही राज्ये एकमेकांना लागून आहेत आणि आता तेथील तत्कालीन सरकार भाजप पाडण्याच्या विचारात असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.
शरद पवारांना नाचता येईना अंगण वाकडे!
वर्धा – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा ईव्हिएमबाबत शंका उपस्थित केली आहे. त्यावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पवारांवर जोरदार टीका केली ‘नाचता येईना अंगण वाकडे’ ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरली आहे. निवडणूक जिंकता आली नाही म्हणून पवारांनी ईव्हीएमला दोष दिला आहे असे ते म्हणाले. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे वर्ध्याचे पालकमंत्री असून वर्ध्याला आल्यानंतर त्यांना शरद पवारांच्या ईव्हीएमबाबतच्या वक्तव्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘धूल थी चेहरे पे और आईना साफ करते रहे’ असे साधारणत पवारांचे राजकारण सुरू आहे. 47 वर्षे यांच्या हातात राज्याची सत्ता होती पण अद्यापही यांना आम्ही राज्याचे सगळे प्रश्न सोडवले असा दावा करता येत नसल्याचीही टीका केली.






























































