सायन-पनवेल मार्गावर बेकायदा प्रवासी वाहतुकीला ब्रेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सायन – पनवेल मार्गावर बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱया वाहनांविरोधात आरटीओने धडक मोहीम उघडली आहे. गेल्या सहा महिन्यांत आरटीओने रचलेल्या सापळ्यामध्ये अवैध प्रवासी वाहतूक करणारी 278 वाहने सापडली असून 33 वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच नियम धाब्यावर बसवणाऱया या वाहनचालकांकडून सुमारे 76 लाख 44 हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.

एकीकडे दिवसेंदिवस वाढत जाणारे पेट्रोल, डिझेलचे भाव आणि परिवहन सेवांचे गैरसोयीचे वेळापत्रक यामुळे वेळेत घर किंवा ऑफिस गाठण्यासाठी सायन- पनवेल महामार्गावर मोठय़ा प्रमाणात अवैध प्रवासी वाहतुकीचे पेव फुटले आहे. परिवहन बसेसच्या तिकिटाइतकेच शेअर सीटचे भाडे असल्याने ‘घाईवर’ असलेले बहुतेक प्रवासी महामार्गावर अशा वाहनांच्या शोधात असल्याचे चित्र नेहमी दिसते. मात्र त्याचा फटका नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेसह विविध महापालिकेच्या परिवहन सेवेला बसत असल्याने अशा अवैध प्रवासी वाहतुकीला बेक लावण्यासाठी आरटीओने एप्रिलपासून विशेष मोहीम राबवली.

98 वाहनांची नोंदणी रद्द
आरटीओने केलेल्या धडक कारवाईत 33 वाहने जप्त तर 98 वाहनांची नोंदणीदेखील रद्द करण्यात आली आहे. ही कारवाई यापुढेदेखील सुरूच ठेवणार असल्याचे आरटीओ अधिकारी लक्ष्मण दराडे यांनी सांगितले.

– आरटीओच्या अधिकाऱयांनी सायन-पनवेल मार्गावर खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल आदी भागांत अवैधपणे प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची धरपकड केली.

– सुमारे 826 लहान-मोठय़ा वानांची झाडाझडती केल्यानंतर 276 वाहनांमध्ये अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याचे आढळून आले.
– बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱया वाहनचालक, मालकांकडून आरटीओने 65 लाख 58 हजार 802 रुपयांचा कर आणि 10 लाख 86 हजार रुपये दंड असे एकूण 76 लाख 44 हजार 810 रुपयांची वसुली केली.