अधिकाऱयांना घसघशीत पगारवाढ, भरती तेथेच आता नियुक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

एसटी महामंडळाची भरती करताना यापुढे गाव भलतीकडे आणि नोकरी भलतीकडे असे होणार नाही. यापुढे उमेदवारांकडून दुसरीकडे आपण बदली मागणार नाही असे लिहून घेण्यात येणार असून ज्या जिह्यात भरती त्याच जिह्यात काम करायला मिळणार असल्याचे परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले.

एसटीच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त ताडदेव येथे आयोजित एका भव्य सोहळय़ात ते बोलत होते. तसेच एसटीच्या महाव्यवस्थापक ते आगार व्यवस्थापकांना पाचव्या वेतन आयोगाप्रमाणे मूळ वेतनात 2.65 पट वाढही यावेळी जाहीर करण्यात आली. तसेच एसटीच्या स्मार्टकार्ड योजनेचाही यावेळी शुभारंभ करण्यात आला.

एसटी महामंडळाचा 71 वा वर्धापन दिन सोहळा ताडदेव येथील गोकुळदास तेजपाल सभागृहात शनिवारी साजरा करण्यात आला. याप्रसंगी परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशीष कुमार सिंह, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल आदी मान्यवर उपस्थित होते.

गैरशिस्त प्रकरणांची चौकशी वेळेत पूर्ण होणार

कर्मचाऱयांनी काही अपहार केल्यास पूर्वी वर्षानुवर्षे चौकशी प्रलंबित राहून अगदी निवृत्तीवेतनही रखडले जात होते त्याचा संदर्भ पकडून रावते यांनी यापुढे कर्मचाऱयांची चौकशी विशिष्ट कालमर्यादेतच होणार आहे. गंभीर प्रकरणे सोडून सरसकट निलंबन ही संकल्पना रद्द करण्यात येऊन कर्मचाऱयांना जादा काळ घरी बसावे लागणार नसल्याचे रावते यांनी सांगितले.

कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द
महाव्यवस्थापक ते आगार व्यवस्थापकांना पाचव्या वेतन आयोगातील 2.65 पट मूळ वेतनातील वाढ यावेळी रावते यांनी जाहीर केली. एसटीच्या कर्मचाऱयांची जशी कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द केली त्याप्रमाणे अधिकाऱयांचीही कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 560 अधिकाऱयांच्या मूळ वेतनात वाढ होणार असून कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द झाल्याचा दोन हजार अधिकाऱयांना फायदा होणार असून त्यांना पदोन्नतीमध्येही 25 टक्के ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

एसटीच तयार करणार गॅस इंधनाच्या गाडय़ा
पर्यावरणाचे संतुलन राखताना यापुढे डिझेलला पर्याय म्हणून सीएनजी, एलएनजी अशा इंधनाचा अभ्यास सुरू असून त्यामुळे डिझेलचे सातशे ते आठशे कोटी वाचणार आहेत. एसटीतून अशा पर्यावरणस्नेही वाहनांची निर्मिती व्हावी असा प्रकल्प आकारास येत असल्याचे रावते यांनी यावेळी सांगितले.

पहिल्या बस वाहकाचा आणि रणरागिणींचा सत्कार
एसटीचा पहिला ऐतिहासिक प्रवास नगर ते पुणे मार्गावर 1 जून 1948 मध्ये बेडफोर्ड गाडीतून झाला होता. त्याचे वाहक असलेल्या लक्ष्मण शंकर केवटे (94) यांचा यावेळी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच संपकाळातही एसटी चालवून एसटीच्या तिजोरीत 2 लाख 30 हजाराची भर घालणाऱया रणरागिणी अनिता पाटील आाणि जयश्री राऊत यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे 9 जून 2017 रोजी ज्यांनी संप घडवला त्या मान्यताप्राप्त युनियनचे सरचिटणी हनुमंतराव ताटे यांच्याच हस्ते या दोघींचा सत्कार घडविल्याने हास्याचे फवारे उडाले. यावेळी एसटी कर्मचाऱयांच्या मारहाणीचा व्हिडीओ चित्रित करण्याचे धाडस दाखविणाऱया प्रगती आणि जुईली या दोघा बहिणींचा सत्कार करण्यात आला.