
मुंबई उपनगरच्या स्वस्तिक मंडळाने बजरंग क्रीडा मंडळाच्या सुवर्ण चषकावर आपल्या नावाची मोहोर उमटविली. अमृत महोत्सवानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत स्वस्तिक मंडळाने अंकुर स्पोर्ट्सचा प्रतिकार 35-26 असा सहज मोडून काढत दणदणीत यश मिळविले. स्वस्तिकचा अक्षय बर्डे सर्वोत्तम खेळाडू ठरला.
श्रमिक जिमखान्यावर झालेल्या या अंतिम लढतीत आक्रमक सुरुवात करीत स्वस्तिकने पहिला लोण अंकुरवर देत आघाडी घेतली. पूर्वार्धात 17-11 अशी महत्त्वपूर्ण आघाडी स्वस्तिककडे होती. उत्तरार्धात आक्रमकतेला मुरड घालत संयमी खेळावर भर देत स्वस्तिकने अंकुरवर आणखी एक लोण देत आपली आघाडी कमी होणार नाही याची काळजी घेतली. अंकुरला एकही लोण देता आला नाही. त्यामुळे सामना फारसा चुरशीचा झाला नाही आणि स्वस्तिकने 9 गुणांनी आपले जेतेपद संपादले. अक्षय बर्डे, आकाश रुडले यांच्या चौफेर चढाया आणि ऋतिक कानडे, प्रफुल्ल चव्हाण यांचा भक्कम बचाव स्वस्तिकच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरला. सुशांत साईल, अभिषेक भोसले, सिद्धेश तटकरे, राकेश भोसले यांचा खेळ अंकुरला विजय मिळवून देण्यात कमी पडला. याअगोदर झालेल्या उपांत्य सामन्यात स्वस्तिकने उत्कर्षाला 40-13 असे, तर अंकुरने बंडय़ा मारुतीला 27-19 असे पराभूत करीत अंतिम फेरी गाठली होती. स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार सुनील शिंदे, आमदार सचिन अहिर, सीताराम साळुंके यांच्या उपस्थितीत पार पडला.

























































