हॉटेल ताज लँड सनमध्ये कामगारांची पगारवाढ; भारतीय कामगार सेना आणि व्यवस्थापनात करार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय कामगार सेनेच्या पुढाकाराने ‘हॉटेल ताज लँड सन’मधील कामगारांच्या पगारात वाढ झाली आहे. शिवसेना उपनेते भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष माननीय सूर्यकांत महाडिक यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी यासंदर्भातील करार करण्यात आला.

‘हॉटेल ताज लँड सन’ मधील कामगारांच्या पगारवाढीबाबत हॉटेल व्यवस्थापनाच्या वतीने प्रवीण चंद्रकुमार अरिया डायरेक्टर, नेविल्ले पिमेटो हॉटेल मॅनेजर, शिरीष गाडगीळ एच आर मॅनेजर, मनीष चिरणवेल डायरेक्टर ऑफ फायनान्स यांनी व्यवस्थापनाच्या वतीने पगारवाढीच्या करारावर स्वाक्षरी केली. हॉटेल युनिट अध्यक्ष धीरज कुमार, युनिट उपाध्यक्ष संदीप तेरेकर, सरचिटणीस सुशांत रेडकर, चिटणीस सुनील नीजाई, खजिनदार मयूर म्हसकर, बाप्पदित्या दास, मोसिन खान या कमिटीने पगारवाढीच्या करारावर सह्या केल्या.

या प्रसंगी भारतीय कामगार सेनेचे ज्येष्ठ उपाध्यक्ष अजित साळवी, चिटणीस मनोज धुमाळ, शरद आजगांवकर कार्यकारिणी सदस्य व कामगार उपस्थित होते. कामगार व व्यवस्थापन यांचा समझोता घडवून आणण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब साहेब यांनी सर्वांना योग्य मार्गदर्शन करत पगारवाढीसंदर्भात महत्त्वाची भूमिका बजावली.

कामगारांकडून मुख्यमंत्र्यांचे आभार

भारतीय कामगार सेनेच्या पुढाकाराने झालेल्या पगारवाढीच्या कराराबाबत सर्व कामगारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार मानले आहेत. पगारवाढीच्या निर्णयामुळे कामगारांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.