मुंबईत सलग तिसऱया दिवशी सातशेपार रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत दैनंदिन रुग्णवाढ कायम असून आज सलग तिसऱया दिवशी सातशेहून जास्त रुग्ण नोंदवले गेले. 1 जून – 739, 2 जून – 704 तर आज 3 जून रोजी सर्वाधिक 763 रुग्णांची नोंद झाली.

मुंबईत आढळलेल्या रुग्णांमधील 37 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील एका रुग्णाला ऑक्सिजनची गरज लागली. तर एकाच दिवसात 352 जणांनी कोरोनावर मात केली. मुंबईत आढळलेल्या नव्या रुग्णांमुळे आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता 10,68,008 झाली आहे.

राज्यातही हजार पार

राज्यात आज सलग तिसऱया दिवशी हजाराच्या पुढे कोरोना रुग्ण सापडले. बुधवारी 1081, गुरुवारी 1,045 तर आज 1,143 रुग्ण सापडले तर 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. 563 रुग्ण कोरोनामुक्त झाले.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत असून हजाराच्या आत असलेली रुग्णसंख्या आता 1100 च्या पुढे गेली आहे, मात्र यातील अर्ध्यापेक्षा जास्त रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98 टक्के इतके जास्त आहे, तर मृत्यूदर 1.87 इतका कमी आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई आणि राज्याची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर गेली असून त्यानुसार महापालिका, नगरपालिका आणि स्थानिक पातळीवर योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.