बेस्ट बस तुटली, मुंबई वाहतूक पोलिसांचे भयंकर मराठी; नेटकऱ्यांनी फटकारले

मुंबई वाहतूक पोलिसांचे ट्विटर हँडल चांगलेच सक्रीय असते. कुठे वाहतूक जाम आहे, कुठे अपघात झाला आहे याची सर्व माहिती या हँडलवर शेअर केली जाते. मात्र बुधवारी वाहतूक पोलिसांनी केलेल्या एका ट्विटवरून नेटकऱ्यांनी त्यांची चांगलीच शाळा घेतली.

हाजीअलीजवळ एक बस बंद पडल्यामुळे नाबार्ड जंक्शनकडे जाणाऱ्या रस्त्यावर ट्राफिक झाले होते. त्याबाबत मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्विट केले. मात्र इंग्लिंशमध्ये अगदी योग्य रित्या ट्विट करणाऱ्या त्या ट्राफिक पोलिसांनी मराठीत अनुवाद करताना त्याला थेट ट्रान्सलेट केले. त्यामुळे इंग्रजीत बेस्ट बस ब्रेक डाऊन असं इंग्रजीत लिहलेलं होतं त्याचं मराठीत बेस्ट बस तुटल्यामुळे असा अनुवाद झाला. पोलिसांनी चक्क ‘बेस्ट बस तुटल्यामुळे हाजी अली जंक्शनवर वाहतूक संथ गतीने सुरू आहे’ असे ट्विट केले.

मुंबई पोलिसांचे हे कच्चे मराठी वाचून नेटकरी देखील चिडले. एकाने ‘मुंबई पोलीसच मराठीची अशी वाट लावणार का?’ असा सवाल केला आहे. तरआणखी एका नेटकऱ्याने काय रे अवस्था मातृ भाषेची… अशा शब्दात खंत व्यक्त केली.