
तृतीय वर्ष एलएलबीची परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांमागील गोंधळाचे दुष्टचक्र परीक्षा सुरू झाली तरी संपायचे नाव घेत नाही. एलएलबीच्या विद्यार्थ्यांची आज अल्टरनेटिव्ह डिसप्युट रिसोल्युशन सिस्टिम विषयाची परीक्षा होती. एकूण 60 गुणांच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दोन तासांचा वेळ देण्यात आला होता. परीक्षा देताना विद्यार्थ्यांना विषय कोड आणि पेपर कोड वेगवेगळे असल्याचे लक्षात आले. त्यामुळे उत्तरपत्रिकेत नेमका कोणता क्रमांक नोंदवायचा असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला.
एलएलबीची परीक्षा जाहीर झाल्यापासून विविध कारणांमुळे गोंधळ उडत असल्याचे चित्र आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा सेनेच्या वतीने या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून हा गोंधळ तातडीने थांबविण्याची मागणी केली आहे. विषय कोड आणि पेपर कोड चुकीचा छापल्याने पुढे पेपर तपासणीवेळी पुन्हा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. उत्तरपत्रिकांची स्क्रूटीनी करण्यास उशीर होऊ शकतो. याचा परिणाम निकालावर होण्याची भीती युवा सेना सहसचिव अॅड. संतोष धोत्रे यांनी व्यक्त केली आहे.

























































