मोडकसागर ओव्हर फ्लो, मुंबईसाठी फेबुवारीपर्यंतचा पाणीसाठा जमा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रात जुलैच्या सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस होत असल्यामुळे सद्यस्थितीत 8,11,522 दशलक्ष लिटर पाणी जमा झाले आहे. मुंबईला दररोज होणारा 3850 दशलक्ष लिटरचा पाणीसाठा पाहता हे पाणी फेब्रुवारी 2023 पर्यंत पुरणारे आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारा मोडक सागर तलावही आज ओव्हर फ्लो झाल्याने मुंबईसाठी दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.

गेल्या काही वर्षांपासून मान्सून सक्रिय होण्यास जुलै उजाडत असल्याने तलावांतील पाणीसाठा तळ गाठतो. या वर्षीही हीच स्थिती राहिल्याने पालिकेने मुंबईत 27 जून 2022 पासून 10 टक्के पाणीकपात लागू केली होती. 1 जुलैपासून जोरदार बरसायला सुरुवात केल्याने पाणीसाठा 26 टक्क्यांवर आल्यानंतर 12 दिवसांतच पाणीकपात रद्द करण्यात आली. तर सद्यस्थितीत सात तलावांत 56 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

मोडक सागर 5 वर्षांच्या तुलनेत यंदा आधीच ओव्हर फ्लो

मोडक सागर तलाव 2021 मध्ये 22 जुलै 2021 रोजी मध्यरात्री 03.24 वाजता ओसंडून वाहू लागला होता. तर त्यापूर्वी म्हणजेच सन 2020 मध्ये 18 ऑगस्ट रोजी रात्री 09.24 वाजता, वर्ष 2019 मध्ये 26 जुलै रोजी भरून वाहू लागला होता. तर त्यापूर्वी सन 2018 व 2017 असे दोन्ही वर्षे हा तलाव 15 जुलै रोजी आणि सन 2016 मध्ये 1 ऑगस्ट रोजी ओव्हर फ्लो झाला होता. या सर्व आधीच्या वर्षांच्या तारखा लक्षात घेता यंदाच्या पावसाळय़ात हा तलाव यापूर्वीच्या नोंदींच्या तुलनेत काही दिवस आधीच ओव्हर फ्लो झाला आहे.

सध्याचा पाणीसाठा

अप्पर वैतरणा 99,268 दशलक्ष लिटर
मोडक सागर 1,24,974 दशलक्ष लिटर
तानसा 96,894 दशलक्ष लिटर
मध्य वैतरणा 1,04,322 दशलक्ष लिटर
भातसा 3,66,113 दशलक्ष लिटर
विहार 14,730 दशलक्ष लिटर
तुळशी 6121 दशलक्ष लिटर

13 जुलैचा 3 वर्षांचा जलसाठा

2022 8,11,522 (56.07 टक्के)
2021 2,50,518 (17.31 टक्के)
2020 3,39,068 (23.43 टक्के)