मुंब्य्रातील इमारतींबाबत माहिती देण्याचे ठाणे पालिकेला हायकोर्टाचे आदेश

पावसाळय़ात इमारती पत्त्यासारख्या कोसळतात; आम्हाला तेच टाळायचेय!

पावसाळय़ात अनधिकृत इमारती पत्त्यासारख्या कोसळून नागरिकांचा बळी जातो आणि आम्हाला तेच नकोय. नागरिकांनी सुरक्षित जीवन जगायला पाहिजे. तो त्यांचा अधिकार आहे, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने आज एका अर्जदारासह प्रशासनाला सुनावले. तसेच मुंबऱ्यातील 9 अनधिकृत इमारतीतील रहिवाशांच्या माहितीत तफावत आढळल्याने मुख्य न्यायमूर्तींनी ठाणे पालिकेला प्रतिज्ञापत्र देण्यास सांगितले.

 मुंब्रा येथील ‘लकी कंपाऊंड’जवळच 9 अनधिकृत इमारती असून त्यातील काही धोकादायक स्थितीत उभ्या आहेत. 5 एप्रिल 2013 रोजी घडलेली लकी पंपाऊंडसारखी कोणतीही दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी मुंबऱ्यातील रहिवासी व लकी पंपाऊंड दुर्घटनेतील साक्षीदार संतोष भोईर यांच्यासह अन्य काही रहिवाशांनी अॅड. नीता कर्णिक यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. आज या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.