
तालुक्यातील सुपली येथील एका व्यक्तीला लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे फसवून नेऊन त्याचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी (दि. 28 जून) घडली आहे. या प्रकरणात प्रेयसीने नव्या प्रियकराच्या मदतीने जुन्या प्रियकराचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी निलंगा पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाऊसाहेब जगन्नाथ माळी (वय 60, रा. सुपली, ता. पंढरपूर) असे खून झालेल्या व्यक्तिचे नाव असून, साधना चंद्रकांत धुमाळ आणि अमरनाथ किणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांत भाऊसाहेब माळी याने फिर्याद दिली आहे.
भाऊसाहेब माळी हे 28 मे रोजी सुपली येथून पंढरपूरला गेले होते. मात्र, ते परत न आल्याने त्यांच्या मुलाने पंढरपूर ग्रामीण पोलिसांत मिसिंगची तक्रार दिली होती. पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी भाऊसाहेब माळी यांच्या मोबाईलचे लोकेशन घेतले असता, ते सांगोला रोड परिसरात असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांच्या मोबाईलचा सीडीआर तपासला असता, त्यांचा मोबाईल निलंगा येथे बंद झाल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी माळी यांच्या संपर्कात असणाऱयांकडे चौकशी केली. त्यात साधना धुमाळ यांच्याबाबत संशय आल्याने पोलिसांनी त्यांच्या मोबाईल कॉलचे विश्लेषण केले. यावेळी धुमाळ या 28 मे रोजी निलंगा येथील अमरनाथ किणे याच्याशी सतत संपर्कामध्ये असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांचा संशय पक्का झाला. दरम्यान, पोलिसांनी पंढरपूर बसस्थानक आणि शहरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली. किणे यांच्या मोबाईल कॉल्सचे डिटेल्स तपासले असता, तो 28 मे रोजी सकाळी निलंगा येथून निघून पंढरपूर येथे आले व लागलीच संध्याकाळी निलंग्याला परत गेल्याचे दिसून आले.
हा सगळा घटनाक्रम अत्यंत संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी किणे याची चौकशी करण्यासाठी पथक रवाना केले. दरम्यान, निलंगा येथे अनोळखी वृद्धाचा मृतदेह मिळून आल्याने पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी हरवलेल्या व्यक्तीचे वर्णन सदर मृतदेहाशी जुळवून पाहिले असता, ती व्यक्ती भाऊसाहेब माळीच असल्याची खात्री झाली. त्यानंतर निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

























































