राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या दौऱयादरम्यान कानपूरमध्ये तुफान दगडफेक, भाजप प्रवक्त्या नूपुर शर्मांविरुद्ध मुस्लिम समाज आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी टीव्हीवरील डिबेटमध्ये मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात शुक्रवारी कानपूरमध्ये मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला. संतप्त निदर्शकांनी तुफान दगडफेक केल्यामुळे कानपूर तसेच आसपासच्या शहरांत प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तर प्रदेश दौऱयादरम्यान हा हिंसाचार उसळला.

शुक्रवारी कानपूरमधील देहातच्या परौख गावातील कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहिले होते. या कार्यक्रम ठिकाणापासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर हिंसाचार उसळला. नमाजानंतर मुस्लिम नागरिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी भाजप नेत्या नूपुर शर्मा यांच्या निषेधार्थ तीव्र निदर्शने सुरू केली. यावेळी दोन समाज समोरासमोर आले आणि तुफान दगडफेकीला सुरुवात झाली. कानपूरच्या परेड चौकात तब्बल एक हजार मुस्लिम आंदोलक एकत्र आले होते. या जमावाने कानपूर शहरात चार तास दगडफेक सुरू केली. पोलिसांनी जमावावर लाठीमार केला.

12 ठाण्यांतील पोलीस तैनात; 18 दंगेखोरांना अटक

हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी 12 पोलीस ठाण्यांतील मोठा फौजफाटा ठिकठिकाणी तैनात करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी तातडीने गोरखपूरमध्ये बैठक बोलावली आणि कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेत दंगेखोरांवर कडक कारवाईचे आदेश दिले. हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत 18 दंगेखोरांना अटक केली.