
नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत 2017 ते 2021 या कालावधीत गोल्ड व्हॅल्युअर व कर्जदारांनी संगनमत करून बनावट दागिने गहाण ठेवून बँकेकडून तब्बल पाच कोटी 30 लाख 13 हजार रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केली होती. या प्रकरणातील प्रमुख आरोपी गोल्ड व्हॅल्युअर विशाल दहिवाळकर याला शुक्रवारी दुपारी अटक करण्यात आली आहे.
सोने तारण ठेवून नगर अर्बन बँकेकडून घेण्यात आलेल्या कर्जाची संबंधितांनी परतफेड केली नाही. त्यामुळे बँकेने या सोन्याचा रीतसर लिलाव ठेवला. लिलावापूर्वी तपासणीला सुरुवात होताच पहिल्या पाच पिशव्यांत सोन्याऐवजी बेंटेक्सचे दागिने असल्याचे आढळून आले होते. तेव्हा हा घोटाळा उघडकीस आला होता. कोटय़वधी रुपयांच्या या घोटाळ्याप्रकरणी 159 जणांना आरोपी करण्यात आले होते.
गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी दहिवळकर हा पसार होता. आर्थिक गुन्हे शाखेमार्फत या गुह्याचा तपास सुरू होता. बहुतांशी आरोपी हे गोरगरीब असून, त्यांतील अनेकांना त्यांच्या नावावर कर्ज असल्याचेही माहीत नव्हते, असे तपासात समोर आले होते. त्यामुळे दहिवळकर याच्या अटकेनंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होणार होता. आर्थिक गुन्हे शाखेने त्याला अटक केल्यामुळे इतर आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अर्बन बँकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी गोरक्षनाथ शिंदे यांनी हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आत्महत्या केली होती. सुमारे दोन-अडीच वर्षांपूर्वी त्यांनी या घोटाळ्याबाबत संशय व्यक्त करून त्याची पूर्वकल्पना बँकेच्या मुख्य शाखेला दिली होती. मात्र, त्यावेळी याप्रकरणी कोणतीही कारवाई झाली नव्हती.
विशेष म्हणजे, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ‘नगर अर्बन बँकेत सोन्याचे मूल्यांकन करणारे प्रतिनिधी (गोल्ड व्हॅल्युअर) व खातेदारांनी केलेल्या चुकांमुळे मला त्रास सहन करावा लागत आहे. सोने तारण ठेवताना खातेदार आणि व्हॅल्युअर यांचा संबंध असतो. त्यात माझा काहीच संबंध नाही,’ अशा स्वरूपाचा उल्लेख होता. सोन्याच्या मूल्यांकन करणारा प्रतिनिधी पोलिसांच्या ताब्यात आल्यामुळे या प्रकरणातील इतर आरोपी समोर येण्यास मदत होणार आहे.




























































