
सामना ऑनलाईन । नागपूर
नागपूरमध्ये कौटुंबिक न्यायालयाने एका दाम्पत्याला व्हॉट्सअॅपवरून घटस्फोट मंजूर केला आहे. न्यायधीश स्वाती चौहान यांनी परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या महिलेला व्हिडीओ कॉल करत तिचा व तिच्या नागपूरमधील नवऱ्याचा घटस्फोट घडवून आणला.
सदर दाम्पत्याचे 11 ऑगस्ट 2013 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर त्या दोघांनाही अमेरिकेतील मिशिगन येथे नोकऱ्या मिळाल्या व ते तेथे राहू लागले. मात्र या जोडप्यातील महिलेचा व्हिसा लवकर संपल्याने ती हिंदुस्थानात परतली व सासू सासऱ्यासोबत नागपूर येथे राहू लागली. तेथे तिचे सासू सासऱ्यासोबत वाद होऊ लागले. त्यामुळे तिने मिशिगन विद्यापीठात पुढील शिक्षणासाठी अर्ज केला व ती स्टुडन्ट व्हिसावर मिशीगन येथे गेली. मात्र सासू सासऱ्यांसोबत झालेल्या वादानंतर त्या दोघांमध्येही विस्तव जाऊ लागला. त्यामुळे त्या दोघांनी नागपूर न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. याप्रकरणात पोटगीची रक्कम ठरल्यानंतर न्यायालयातून महिलेला व्हिडीओ कॉल करण्यात आला. त्यावेळी या महिलेचा पती नागपूरमध्येच असल्याने तो स्वत: न्यायालयात हजर होता. त्यानंतर न्यायालयाने व्हिडीओ कॉलद्वारे त्या महिलेला घटस्फोट मंजूर झाल्याचे सांगितले.

























































