
सामना प्रतिनिधी । नागपूर
नागपूरला स्मार्ट सिटी बनवण्याच्या गप्पा मारणाऱया नितीन गडकरी-देवेंद्र फडणवीसांची मुसळधार पावसाने पोलखोल केली. पावसामुळे अवघ्या दहा मिनिटांत नागपूर शहर तुंबले. नागपूर महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा पावसाने अक्षरश: चिखल केला. वीज खंडित झाल्याने ८० टक्के नागपूर अंधारमय झाले. तुंबलेल्या पाण्यात विजेचे ट्रान्सफॉर्मर बुडाल्याने विधानभवनाची वीज गायब झाली आणि विधिमंडळाचे कामकाज अंधारात वाहून गेले. विधानसभेचे कामकाज तहकूब करण्याची नामुष्की अध्यक्षांवर ओढवली. पाणी तुंबण्याचे कारण शोधत असताना विधान भवनाच्या गटारांमध्ये दारूच्या बाटल्यांचा खच पाहून अध्यक्षही भिरभिरले. एरव्ही ऊठसूट मुंबईवर टीका करणाऱयांची बोलतीही या पावसाने बंद केली आणि प्रसारमाध्यमांच्या नजरा चुकवून त्यांना विधान भवनातून काढता पाय घ्यावा लागला. दरम्यान, रामटेक येथे अंगावर वीज कोसळून दोनजण ठार झाले, तर शहरातील नाल्यांमध्ये दोघेजण वाहून गेले.
बुधवारी रात्रीपासून पावसाची आवर्तन सुरू होती, मात्र गुरुवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढत गेला. शुक्रवारी सकाळी पावसाने रौद्र रूप धारण करून नागपूर शहरात प्रलयाची स्थिती निर्माण केली. रस्ते, रेल्वे व हवाई वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. विधान भवन, मंत्र्यांची निवासस्थाने असणाऱया रविभवन परिसरातही प्रचंड पाणी साचले होते. अनेक मंत्र्यांच्या व विरोधी पक्षनेत्यांच्या बंगल्यांतच पाणी शिरले होते. पावसामुळे विधिमंडळातील टेलिफोन व इंटरनेट सेवाही बंद पडली होती. विमानतळावर व परिसरात मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते. वादळी पावसाने नागपूर विमानतळावर विमाने उतरत नव्हती. मुंबई व पुण्याहून नागपूरला येणारी सकाळची विमाने हैदराबादकडे वळवण्यात आली. नागपुरात सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनलाही या पावसाचा तडाखा बसला. विधान भवन परिसरात पाणी तुंबल्याने व वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे विधिमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले व सरकारचे वाभाडे काढण्याची आयतीच संधी विरोधकांना मिळाली. मुंबई तुंबते तेव्हा शिवसेनेकडे बोट दाखवणाऱया भाजपला आज नागपूरची दैना उडाल्याने मोठय़ा टीकेला सामोरे जावे लागले. पुरेशी पूर्वतयारी न करता नागपुरात पावसाळी अधिवेशन घेण्याच्या दुराग्रहामुळे हा निर्णय सरकारच्या चांगलाच अंगलट आला आहे.
मुंबईवर टीका करणाऱ्यांची बोलती बंद
एरव्ही ऊठसूट मुंबईवर टीका करणाऱ्यांची बोलती आज नागपूरचे तुंबापूर झालेले पाहिल्यानंतर मात्र बंद झाली. खुद्द भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्याकडे प्रतिक्रिया मागण्यासाठी पत्रकार गेले असता मी नंतर बोलेन एवढेच सांगत तेथून काढता पाय घेतला. तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पाऊस हा शेतकऱ्याला हवा असतो. या पावसामुळे जर कुणाच्या मनात काळंबेरं येत असेल तर तो शेतकरीपुत्र नाही, असे म्हणत वेळ मारून नेली.
विधान भवन अंधारात
नागपूरमध्ये झालेल्या या तासाभराच्या पावसात विधिमंडळाच्या तळघरात असलेले विजेचे ट्रान्सफॉर्मर पाण्याखाली बुडाले. शॉर्टसर्किट झाल्याने तत्काळ वीजप्रवाह बंद करण्यात आला. यामुळे अख्ख्या विधान भवनात अंधार पसरला. मोबाईलच्या लाइटमध्येच आमदारांनी आणि स्वतः अध्यक्षांनी विधान भवनात प्रवेश केला. कामकाज सुरू होण्याआधीच अध्यक्षांनी तासाभरासाठी विधानसभेचे कामकाज तहकूब केले. पुन्हा १२ वाजता कामकाज सुरू झाले तेव्हा वीजप्रवाह सुरू झालाच नव्हता. यावेळी विरोधकांनी विधानसभेतील अंधारावर बोलण्याची मागितलेली परवानगी न देता अध्यक्षांनी विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
– सकाळी साडेआठ ते दुपारी अडीच या सहा तासांत नागपूर शहरात तब्बल२६३.५ मिमी एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली. यामुळे संपूर्ण शहर जलमय झाले होते. २१ जुलै १९९४ रोजी २४ तासांत नागपूरमध्ये ३०४.६ मिमी पावसाची नोंद झाली होती. २४ वर्षांचा हा विक्रम आज मोडीत निघाला.
– विधानभवनात नाल्यातील कचरा बाहेर काढण्याचे काम सुरू झाले तेव्हा त्यासोबत दारूच्या रिकाम्या बाटल्याही बाहेर यायला लागल्या. एवढ्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत बाटल्या आतपर्यंत पोहचल्याच कशा असा प्रश्न
आता निर्माण झाला आहे.
नागपूर महापालिकेच्या कारभाराची चौकशी करा; शिवसेनेची मागणी
मुंबईत अशाच पद्धतीचे पाणी साचले असते तर मुंबई महानगरपालिकेवर आक्षेप घेतले असते. तेथील पालिकेच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली असती. महापालिकेच्या कार्यक्षमतेवर शंका घेतली गेली असती. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे. पावसाळी अधिवेशनात नागपूर शहराची परिस्थिती पूरमय झाली आहे. त्यामुळे नागपूर महापालिकेची चौकशी राज्य सरकारने करावी अशी मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी केली. यावेळी शिवसेनेच्या सर्व आमदारांनी नागपूर महापालिकेच्या कारभाराची चौकशी करा अशा जोरदार घोषणा दिल्या.
पावसाळी अधिवेशन नागपूरला घेऊन सरकारचं नियोजन फसलं – धनंजय मुंडे
साडेतीन वर्षांत सरकारचं नियोजन जसं पूर्णपणे फसलं आहे तसंच पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेऊन हे सरकार फसलं आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. पावसाळी अधिवेशन यापूर्वी कधी नागपूरमध्ये झाले नव्हते. आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की, पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेऊ नका. पाऊस जर मोठा पडला तर नागपूरमध्ये राहण्याच्या व्यवस्थेपासून ते विधिमंडळाच्या कामकाजापर्यंत परिणाम होईल आणि आज तो दिवस आला. याचसाठी केला होता अट्टहास असंच आता म्हणावे लागेल असेही मुंडे म्हणाले.
दारूच्या बाटल्यांची चौकशी करा – प्रताप सरनाईक
विधिमंडळ हे लोकशाहीतील पवित्र मंदिर आहे. या मंदिरात दारूच्या व बीअरच्या बाटल्या कशा आल्या याची चौकशी करण्याची मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. ते पुढे म्हणाले की, आमदारांच्या स्वीय सहाय्यकांनाही विधिमंडळाच्या परिसरात येण्यास मज्जाव केला जातो. या परिसरात एवढी कडक सुरक्षा व्यवस्था असताना मग आतमध्ये दारूच्या बाटल्या कशा येतात याची चौकशी होणे गरजेचे आहे. दारूच्या बाटल्या आतमध्ये आणणाऱयांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे, असे प्रताप सरनाईक म्हणाले.
बाटल्यांचा लाभार्थी कोण?
विधिमंडळाच्या परिसरातील गटारात दारूच्या बाटल्या सापडण्याच्या घटनेचा काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनीही निषेध केला आहे. ‘होय, हे माझे सरकार..मी लाभार्थी…’ अशी जाहिरात भाजपचे सरकार करते तर मग या दारूच्या बाटल्यांचा लाभार्थी कोण होता याचीही चौकशी होणे गरजेचे आहे, असे शेख म्हणाले.
बालहट्टापायी अधिवेशनाचा निर्णय -अजित पवार
या सरकारला कुठल्याच गोष्टीचं गांभीर्य आणि स्कारस्य राहिलेले नाही. अक्षरशः पोरखेळ चालला आहे. त्यामुळे आजचा दिकस काया गेलेला आहे. या सरकारमध्ये असलेल्यांनी याची भरपाई दिली पाहिजे. या सरकारने तुमच्या-माझ्या राज्याला चार लाख कोटी कर्जाच्या खाईत लोटले आहे. असे असतानाही हे किती बेपर्काईने काम चालते याचे मूर्तिमंत उदाहारण आज पाहायला मिळाले. लाखो रुपये खर्च कुणाचे होतात. किधिमंडळाच्या परिसरामध्ये,आकारामध्ये जो काही पाऊस पडला त्याचं पाणी ड्रेनेजच्या माध्यमातून, गटाराच्या माध्यमातून नीटपणे जायला हकं होतं. गटारे का साफ केली नाही? हे सरकार झोपा काढतंय का, असा संतप्त सकाल अजित पवार यांनी केला.
सरकार शुद्धीकर का नाही, याचे
कारण आता उमगले! – किखे-पाटील
विधान भवनातील गटारात दारूच्या बाटल्या सापडल्याच्या घटनेवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी खोचक टीका केली असून हे सरकार मागील चार वर्षांपासून शुद्धीवर का नाही याचे कारण आता उमगले आहे. या सरकारकडे ‘डिझास्टर मॅनेजमेंट’ नाही. उलटपक्षी त्यांचे ‘मॅनेजमेंट’च एक ‘डिझास्टर’ आहे. म्हणूनच पाऊस आणि खंडित वीज पुरवठय़ामुळे विधिमंडळाचे कामकाज बंद करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली. भाजप-शिवसेना सरकारने महाराष्ट्राला अगोदरच अंधारात ढकलले आहे. आज विधिमंडळालाही अंधारात ढकलले. राज्याला तर अगोदरच बुडवले आहे. आता विधान भवनही बुडते की काय, अशी गंभीर परिस्थिती या सरकारने निर्माण करून ठेवल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले.
ऊठसूट मुंबईवर टीका करणाऱयांनी आधी नागपूर सुधारावे
ऊठसूट मुंबईच्या पायाभूत सुविधांवर टीका करणाऱया भाजपच्या नेत्यांनी आधी नागपूर सुधारावे, असा सल्ला शिवसेनेचे विधान परिषदेतील गटनेते आमदार अॅड. अनिल परब यांनी दिला आहे. मुंबईत पाऊस आल्यानंतर तेथे होणाऱया अवस्थेवर एका क्षणाचाही विलंब न लावता शिवसेनेने मुंबई बकाल केली असे पालूपद लावले जाते. नागपूर हे स्मार्ट सिटी आहे असा आव आणला जातो, परंतु एक दिवसाच्या पावसाने नागपूरचा विकासाचा चेहरा उघडा पडला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तर नागपूरच्या नाग नदीत बोट चालविण्याचे स्वप्न नागपूरकरांना दाखवले होते. या पावसाने गडकरींचे हे स्वप्न पूर्ण होईल, अशी उपहासात्मक टीका त्यांनी केली. पावसाळय़ात मुंबई तुंबते म्हणून पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याचा हट्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता, परंतु कोणतेही नियोजन प्रशासनाने केले नव्हते. महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास, मेट्रो, स्मार्ट सिटी यापैकी कुणाची जबाबदारी हे आता निश्चित करण्याची वेळ आली आहे. पावसाळय़ात मुंबईत पाणी साचल्यानंतर मुंबई महापालिकेवर टीका करण्याचा भाजपच्या नेत्यांचा आवडता छंद आहे. शिवसेनेने पायाभूत सुविधा केल्या नाहीत असा आरोप केला जातो, परंतु आता नागपुरातील पायाभूत सुविधांची जबाबदारी कुणाची याचे उत्तर आता राज्यातील 12 कोटी जनतेला देण्याची गरज असल्याचे परब यांनी सांगितले.
पावसाळी गैरव्यवस्थापनामुळे दाणादाण
मुंबईमध्ये समुद्र असल्याने पाणी साचते. नागपूरमध्ये समुद्रही नाही. तरीही मुंबईमध्ये पावसामुळे वीज गेल्याने अधिवेशनाचा दिवस वाया गेला, असे कधीच झाले नाही. त्यामुळे नागपूरला पावसाळी अधिवेशन घेण्याचा नेमका उद्देश काय होता हा प्रश्न अनुत्तरितच राहत आहे. मुंबईहून नागपूरला अधिवेशन घेण्याचा हेतू काही असो. आजचे कामकाज वाया गेल्याने बऱयाच समज-गैरसमजांवर प्रकाश पडला आहे, असे शिवसेना आमदार डॉ. नीलम गोऱहे म्हणाल्या.

































































