शतक महोत्सवी नायर रुग्णालयाला 100 कोटींचा निधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्यापासून मंदिरे बंद आहेत; मात्र लाखो रुग्णांचे जीव वाचवणारा देव डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱयांच्या रूपात रुग्णालयात अहोरात्र काम करीत आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. पालिकेच्या नायर रुग्णालय शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रुग्णसेवेची गौरवशाली शंभरी पूर्ण करणाऱया नायरला राज्य सरकार आणि पालिकेकडून 100 कोटींचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

स्वातंत्र्यपूर्व काळात 25 वर्षांपूर्वी प्रतिपूल परिस्थितीत अनेक अडचणींचा सामना करीत आणि अनेकांच्या दानशूरपणामुळे स्थापन झालेल्या नायर रुग्णालयाची 100 वर्षांची वाटचाल अभिमानास्पद आणि थक्क करणारी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होते. अनेकांनी स्वतःचा जीव ओतून रुग्णालयाची इमारत जीवनदान देणारी बनवल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. काळानुरूप अत्याधुनिक बदल स्वीकारून रुग्णालय चालवले जात आहे. कोरोनाकाळात डॉक्टरही रुग्णांवर उपचार करण्यास घाबरत असताना नायर रुग्णालयाने कोविडच्या रुग्णांवर स्वतःचा जीव धोक्यात घालून उपचार केल्याचे ते म्हणाले. जिद्द काय असते याची प्रचीती नायर रुग्णालयाने दाखवून दिल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री अस्लम शेख, आमदार यामिनी जाधव, उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, आमदार रईस शेख, सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर, स्थापत्य समिती अध्यक्ष दत्ता पोंगडे, स्वप्नील टेंबवलकर, आरोग्य समिती अध्यक्षा राजूल पटेल, प्रभाग समिती अध्यक्ष रमाकांत रहाटे, नगरसेविका गीता गवळी, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, नायरचे डीन डॉ. रमेश भारमल, मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, पोस्ट मास्टर जनरल हरिश्चंद्र अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

शतक महोत्सवी नायरची दमदार कामगिरी

– रुग्णालयात कौशल्य प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.
– टपाल खात्याकडून नायर रुग्णालयावर विशेष टपाल तिकीट प्रकाशित.
– एक हजार शोधनिबंध असलेल्या नायरच्या शंभर वर्षांची वाटचाल सांगणारा माहितीपट प्रदर्शित.
– कोविडकाळातील कामगिरीवर वैद्यकीय दस्तावेज प्रकाशित.
– संगणकाच्या मदतीने प्रशिक्षण प्रयोगशाळा, रोगप्रतिकारशक्ती शास्त्र्ा संशोधन पेंद्र सुरू.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून रुग्णसेवेचा गौरव

व्यथा घेऊन आपण जसे मंदिरात देवाकडे जातो. त्याचप्रकारे गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ रुग्ण व्याधी घेऊन रुग्णालयात जात आहेत. औषधोपचार घेऊन हसतखेळत आपल्या घरी जात आहेत. कारण डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, आरोग्य कर्मचारी देवाच्या रूपात सेवा करीत आहेत.
– उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

लढा संग्रहित करा!

आघाडी सरकार स्थापन झाल्यावर अवघ्या काही दिवसांतच अनाकलनीय अशी कोविडची साथ आली. मात्र खऱया अर्थाने डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱयांनी ‘अहोरात्र’ लढून संकटाचा सामना केला. हा लढा थक्क करणारा आहे. शंभर वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लूची साथ आली तेव्हाही हीच स्थिती होती. मात्र तो लढा लिखित स्वरूपात संग्रहित नाही. केवळ मास्क लावल्याची काही चित्रे आहेत. त्यामुळे आताचा कोविड लढा संग्रहित करा, जेणेकरून पुढल्या पिढीस तो मार्गदर्शक ठरेल, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

आदर्श निर्माण करणारे काम करा!

नायरच्या उभारणीत अनेक दानशूरांचे योगदान आहे. अनेकांनी दान केल्यामुळेच आज रुग्णालय अनेकांना जीवनदान देत असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. त्यामुळे रुग्णालयाच्या अत्याधुनिकीकरणासाठी मिळणाऱया निधीतून असे काम करा की पुढील शंभर वर्षांनी जेव्हा इतिहास पाहिला जाईल तेव्हा सर्वांना अभिमान वाटेल, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. पुढील एक हजारपेक्षा जास्त वर्षे नायर अशीच रुग्णसेवा देत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.