
एका महिन्यात एकापाठोपाठ एक चार-पाच भाजपा नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला. हे काही अनवधानाने घडलेले नाही. महाराजांची बदनामी करण्याचे हे भाजपचे नियोजित षडयंत्र आहे, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज भाजपवर निशाणा साधला.
नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याची भारतीय जनता पक्षात चढाओढच लागल्याचे दिसत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड आणि रावसाहेब दानवे यांनी महाराजांबद्दल अवमानकारक विधाने केली. हे सर्व जण भाजपचे आहेत. यापूर्वीही छिंदम नावाच्या भाजपा नेत्याने शिवरायांचा अवमान केला होता. राजरोसपणे अशी अपमान करणारी वक्तव्ये होत असताना भाजपने संबंधितांवर काहीच कारवाई केलेली नाही. महाराष्ट्राची जनता भाजपाच्या या बेताल लोकांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.

























































