लाच घेतल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नांदेड

घरगुती वादात गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस जमादाराकरवी 50 हजाराची लाच घेणारे किनवट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप तिडके यांच्यासह जमादार मधुकर पांचाळ यांच्याविरुद्ध नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी 14 रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.

किनवट शहराच्या राजेंद्रनगरातील रहिवाशी नचिकेत नेम्मानीवार व त्यांच्या नातेवाईकांमध्ये घर कुणाचे,यावरून गेल्या कांही दिवसांपासून वाद आहे. नचिकेत यांच्या विरोधातील नातेवाईकांनी नचिकेत यांनी बोगस कागदपत्रे सादर करून घर हडपल्याची तक्रार पोलिसांत दिली. सदर बाब न्यायालयाच्या कक्षेत येत असतानाही नातेवाईकांच्या चिथावणीवरून पोलीस निरीक्षक दिलीप तिडके यांनी नचिकेत नेम्मानीवार यांना याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्याची धमकी दिली. सदर प्रकरणात अटक न करण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केली.तडजोडीअंती अटक न करण्यासाठी 50 हजार रुपये लाच देण्याचे ठरले. सदर रक्कम शुक्रवारी सायंकाळी देण्याचे तक्रारकर्ते नेम्मानीवार यांनी मान्यही केले.

दरम्यान,याप्रकरणी नचिकेत नेम्मानीवार यांनी गुरुवारी .नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पोलीस निरीक्षक तिडके 50 हजाराची लाच मागत असल्याची तक्रार केली. त्यावरून एसीबीच्या पथकाने शुक्रवारी रात्री जमादार मधुकर पांचाळ यांनी पोलीस निरीक्षक दिलीप तिडके यांच्यासाठी 50 हजाराची लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडले. 50 हजार रुपये असलेली बॅग पथकाने पोलीस ठाण्यात आणून जमा केली. याप्रकरणाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षकाच्या घरातून मिराशे नामक गृहरक्षक दलाच्या जवानाने 2 बॅगा घेऊन मोटारसायकलवरून पळ काढल्याचे जमावाने सांगितले. दरम्यान,लाचप्रकरणी पो.नि.दिलीप तिडके यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा,यासाठी पोलीस ठाण्यात मोठा जमाव होता.रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.