
सामना प्रतिनिधी। नांदेड
तब्बल साडेसहा हजार स्पर्धकातून निवडलेल्या माहूरच्या स्वराली राजू जाधव या तेरा वर्षीय गायिकेने सध्या कलर्स मराठीच्या सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात धमाल उडवून दिली असून रसिक, प्रेक्षकांच्या आवडीची गाणी अत्यंत ताकदीने सादर करून तिने सबंध महाराष्ट्रात आपले नाव चर्चेत ठेवले आहे.
सरस्वती राज संगीत विद्यालय माहूर जि.नांदेड येथील राजू नामदेवराव जाधव यांची तेरा वर्षाची कन्या स्वराली राजू जाधव हिने संगीताची प्रवेशिका पूर्ण परीक्षा उत्तीर्ण केली आहे. सूर नवा ध्यास नवा (छोटे सूरवीर) या कलर्स मराठीच्या आवाज चाचणीत तिने भाग घेतला. जुलै महिन्यात महाराष्ट्रातील निवडक आठ शहरांमध्ये ज्या सहा हजार पाचशे स्पर्धकांनी आवाजाची चाचणी दिली, त्यात 70 स्पर्धकांना बोलाविण्यात आले. त्यातून 21 स्पर्धकांची अंतिम निवड झाली. आज अंतिम नऊ गायिकांमध्ये स्वराली गात आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या गोवर लसीकरण मोहिमेची ब्रँण्ड अम्बॅसडर म्हणून तिची शिफारस करण्यात आली आहे.
कलर्स मराठीच्या प्रत्येक भागात तिने गायिलेल्या गाण्यांना महाराष्ट्रातील रसिक, प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. सुफी, ढुमरी, लावणी, लोकगीत व शास्त्रीय गायन या तिच्या गायन शैलीने तिने मन लावून अभ्यास केल्याने तिच्या प्रत्येक गाण्यात आवीट गोडवा आणि शास्त्रोक्त पध्दती तंतोतंत दिसून येत आहे. तिचे आवडते गायक शोभा गुर्टू, नुसरत फत्तेह अली खान, सुलोचना चव्हाण, कैलास खैर आणि रिचा शर्मा आहेत. राज्यस्तरीय अहमदनगर स्वरसंग्राम -2018 ची ती विजेती देखील ठरली आहे.
. माहूर गडसारख्या तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी गायन कलेच्या फारशा सुविधा नसताना आपल्या वडिलांनी दिलेल्या संगीत शिक्षणाच्या आधारावर स्वरालीने सध्या धमाल उडवून दिली आहे. तिने गायिलेल्या उघड्या पुन्हा जाहल्या या गीताला तर प्रेक्षक व परिक्षकांनी भरभरुन दाद दिली. शेवटच्या अंतिम नऊ जणात स्वराली जाधव माहूरगड, नेहा केणे (टिटवाळा), उत्कर्ष वानखेडे (नागपूर), सई जोशी (बदलापूर), चैतन्य देवडे (आळंदी), विश्वजा जाधव (विरार), मीरा निलाखे (सांगली), सक्षम सोनवणे (संभाजीनगर), अंशिका चोणकर (डोंबिवली) या छोट्या कलावंतांचा समावेश असून, तेरा वर्षीय स्वराली जाधवने रसिक,प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

































































