
राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत उत्तर दिले. त्यानंतर पुढच्या काही तासांत राज्यसभेत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान पेंद्रीय मंत्री नारायण राणे भलतेच गोंधळले. राज्यसभेतील भाजपचे खासदार कार्तिकेय शर्मा यांनी त्यांना प्रश्न विचारून अडचणीत आणले. इंग्रजीत विचारलेला प्रश्न डोक्यावरून गेल्यामुळे राणे गडबडले आणि भलतेच उत्तर दिले. अखेर राज्यसभा उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह यांनी शर्मा यांना बोलावून त्यांच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे असे निर्देश राणेंना देऊन त्यांना खाली बसवले. राणेंच्या केविलवाण्या अवस्थेची राज्यसभा सदस्यांमध्ये जोरदार चर्चा होती.
एमएसएमई क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी सरकारने कोणती पावले उचलली, असा प्रश्न शर्मा यांनी विचारला. राणे यांनी निर्यात कशा पद्धतीने वाढवणार हे सांगितले. तसेच आपलेच उत्तर पुढे दामटवत राहिले. शेवटी उपाध्यक्षांना हस्तक्षेप करावा लागला.
प्रश्न कळत नाही ते उद्योगांना काय चालना देणार?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राणेंच्या केविलवाण्या अवस्थेचा व्हिडीओ ‘एक्स’वरून शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी जोरदार पॅप्शनही दिले आहे. ज्यांना प्रश्नदेखील कळत नाही ते एमएसएमईना काय दिशा आणि चालना देणार? राजकारणात नुसती दादागिरी चालत नाही. तसेच बॉसचा वरदहस्तही फार काळ चालत नाही, असा टोला दमानिया यांनी कॅप्शनमधून लगावला आहे.




























































