नारायण राणे हाजिर हो! 2 सप्टेंबर रोजी नाशिकच्या पोलीस ठाण्यात हजेरी लावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात नाशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याने 2 सप्टेंबर रोजी त्यांना नाशिकमध्ये हजर व्हावे लागणार आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नारायण राणे यांनी देखील 2 सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये हजेरी लावून पोलिसांना संपूर्ण सहकार्य करणार असल्याची हमी देखील दिली असल्याचे दीपक पांडे यांनी सांगितले आहे.

जन आशीर्वाद यात्रा काढणारे नारायण राणे सोमवारी महाडमध्ये होते. तेथे संध्याकाळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर राणे आणि भाजपविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली. नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांनी रात्रीच पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली आणि कारवाईची मागणी केली. नाशिकचे आयुक्त दीपक पांडे यांनीही या तक्रारीची गंभीर दखल घेऊन राणे यांच्या अटकेचे आदेश दिले. ‘नाशिक पोलिसांचे एक पथक अटकेच्या कारवाईसाठी सकाळी चिपळूणच्या दिशेने रवानाही झाले. तोपर्यंत रत्नागिरीत देखील तक्रार दाखल झाली होती. त्यामुळे रत्नागिरी पोलिसांनी त्यांना अटक केली. रात्री उशिरापर्यंत महाड कोर्टात कारवाई सुरू होती. त्यानंतर नारायण राणे यांनी याची पुनरावृत्ती होणार नाही अशी हमी दिल्यानंतर त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली. नाशिक पोलिसांची नोटीस देखील त्यांना मिळाली असून त्यांनी 2 सप्टेंबर रोजी नाशिक मध्ये हजेरी लावण्याचे मान्य केलं आहे. तसेच या गोष्टीची पुनरावृत्ती होणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. तपासात पूर्ण सहकार्य करण्यास सहमती दर्शवल्याने अटकेच्या कारवाईचा प्रश्न सध्या तरी उपस्थित होत नाही’, असे दीपक पांडे यांनी आज स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी या संपूर्ण कारवाईबाबत माहिती दिली. 2 सप्टेंबरपर्यंत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नाशिक पोलिसांसमोर हजर व्हायचे असल्याचे त्यांनी सांगितले. जबाब नोंदवण्यासाठी आणि इतर कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी त्यांना पोलिसांसमोर हजर होण्यास सांगितलं असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितले.

घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, कायदा,सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये ही अटकेच्या आदेशांमागील भूमिका असल्याचं आयुक्त पांडे यांनी सांगितले. महाड न्यायालयामध्ये राणे यांनी घटनेची पुनरावृत्ती होणार नाही असं आश्वासन दिल्याने त्यांना अटक करण्यात आली नाही असं ते म्हणाले. नाशिक पोलिसांनी राणे यांना 2 सप्टेंबरपर्यंत नाशिक पोलिसांत हजर राहण्यासाठी समजपत्र दिले आहे. राणे यांनी त्यावर सही केली असून तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असे असेही पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या अटकेच्या आदेशावरून विचारलेल्या प्रश्नांबाबत पांडे यांना विचारले असता ते म्हणाले की जे आदेश आपण काढले आहे ते योग्य आणि न्यायसंगत आहेत. आपण आपल्या आदेशांवर ठाम असल्याचेही ते म्हणाले. जर कोणाला यावर आक्षेप असेल तर संविधानाच्या कलम 226, कलम 227 अंतर्गत हे आदेश रद्द करवून घेऊ शकतात असे आयुक्त पांडे म्हणाले.