मोदी-अदानी भाई भाई… देश बेचकर मलई खाई! मोदींसमोरच विरोधकांचा गोंधळ, राज्यसभेत रणकंदन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेहरूंच्या वारसांना त्यांचे नाव लावण्याची भीती का वाटते? पुन्हा नेहरू आले धावून, 90 मिनिटांच्या भाषणात अदानी प्रकरणावर अवाक्षर नाही

अदानींमुळे संकटात सापडलेल्या पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या मदतीला आज अखेर ‘नेहरू’च धावून आले. मोदींनी राज्यसभेत नव्वद मिनिटे भाषण ठोकले, पण या लंब्याचौडय़ा भाषणात अदानी प्रकरणावर अवाक्षरही काढले नाही. नेहरूंचा संदर्भ देत गांधींवर टीका आणि काँग्रेसचे 70 वर्षांतील अपयश एवढेच त्या भाषणाचे सार होते. नेहरू जर महान होते, तर मग त्यांच्या वारसांना नेहरू आडनाव लावताना भीती का वाटते? नेहरू आडनाव लावण्यात लाज कसली, अशा शब्दांत मोदी यांनी गांधी कुटुंबावर टीका केली. मोदी भाषणाला उभे राहताच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘मोदी अदानी भाई-भाई, देश बेचकर खाई मलाई’ ही घोषणा तर सभागृहात दुमदुमली. या घोषणांमुळे राज्यसभेत जबरदस्त रणकंदन पाहायला मिळाले.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत उत्तर दिले. गांधी कुटुंबावर टीका करताना ते म्हणाले, हिंदुस्थान हा सामान्य माणसांच्या घामातून उभा राहिला आहे आणि अनेक पिढय़ांनी चालत आलेल्या परंपरेतून या देशाची जडणघडण झाली आहे. एका कुटुंबाची ही खासगी मालमत्ता नव्हे. म्हणूनच आम्ही ‘खेलरत्न’ पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद केले, तर अंदमानमधील बेटांना सुभाषचंद्र बोस तसेच परमवीर चक्र विजेत्या जवानांचे नाव दिले, असे मोदी म्हणाले.

दणकेबाज घोषणा

जुमलेबाजी नही चलेगी, नही चलेगी

जेपीसी से जाँच कराओ, जाँच कराओ

अदानी की गुलामी बंद करो, बंद करो!

जेपीसी पर कुछ तो बोलो…

मौनी बाबा कुछ तो बोलो

एलआयसी पर कुछ तो बोलो,

कुछ तो बोलो… कुछ तो बोलो

शरद पवारांचा मी नेहमी आदर करतो!

शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, मी त्यांना नेहमी आदरणीय मानतो, असे सांगताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली.  या सभागृहात शरद पवार आहेत. त्यांना मी आदरणीय नेता मानतो. 1980 मध्ये शरद पवार 35 ते 40 वर्षांचे असतील; पण त्यांचे सरकार काँग्रेसने पाडले. आज तेही काँग्रेसच्या बाजूने आहेत. प्रत्येक प्रादेशिक पक्षाला, त्यांच्या नेत्याला काँग्रेसने त्रास दिला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधान राज्यसभेत काय म्हणाले?

कोणत्याही कार्यक्रमात पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावाचा उल्लेख झाला नाही तर काहींच्या डोक्यावरील केस उभे राहतात. आमच्याकडून चुकून नाव राहिले गेले असेल तर ते आम्ही ठीक करू शकतो. नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान होते; मात्र त्यांचे जे वारसदार आहेत त्यातील कोणत्याही व्यक्तीला नेहरूंचे आडनाव लावण्यास भीती का वाटते?

अखंडपणे घोषणाबाजी सुरू आहे. घोषणा देण्यासाठी माणसं बदलावी लागत आहेत. देश पाहतो आहे की ‘एक अकेला कितनों पर भारी पड रहा हैं.’

विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणतात, ‘‘आम्ही 60 वर्षांत देशाला भक्कम बनवले. त्यांची तक्रार आहे की, पाया काँग्रेसने तयार केला आणि श्रेय मोदी घेत आहेत. मात्र, 2014 मध्ये सत्तेत आल्यावर मी अनेक गेष्टी बारकाईने पाहिल्या तेव्हा लक्षात आले की, 60 वर्षे काँग्रेस परिवाराने केवळ खड्डेच खड्डे निर्माण केले.’’

काँग्रेसला आर्थिक धोरण समजत नाही, केवळ सत्तेचा खेळ समजतो.

काँग्रेसने राज्यघटनेतील 357 कलमाचा वापर करून 90 वेळा राज्य सरकारे पाडली. इंदिरा गांधी यांनी तर 356चा 50 वेळा वापर केला.