
देशभरात शनिवारी व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगच्या साईट डाऊन झाल्याचा मुद्दा हाती घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला.
काल 50 मिनिटांसाठी व्हॉट्सऍप डाऊन झाले होते. सोशल मीडिया डाऊन झाले होते. त्यामुळे सर्व जण त्रस्त झाले, पण इथे पश्चिम बंगालमध्ये गेल्या 50 वर्षांत विकास डाऊन झालाय, लोकांची स्वप्ने आणि संकल्प डाऊन झाला असल्याचा घणाघाती आरोप पंतप्रधानांनी केला.
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान येत्या 27 मार्च रोजी होत आहे. त्यासाठी प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहचली असून सभांचा जोरही वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी खडगपूर येथे सभा आयोजित केली होती. या सभेत त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीकेची झोड उठविली.
भाजप उद्या 21 मार्च रोजी आपला जाहीरनामा प्रकाशित करणार असल्याची माहिती निवडणूक प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी दिली. केंद्रीय मंत्री अमित शहा कोलकाता दौऱयावर असून ते हा जाहीरनामा लोकांसमोर आणतील असे बोलले जात आहे.




























































