विधिमंडळ आणि मूळ पक्ष वेगळा, मग फूट मान्य कशी? शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा सवाल

विधिमंडळ आणि मूळ पक्ष वेगळा आहे. मग राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये फूट पडली हे मान्य कसे करण्यात आले, असा सवाल शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉँग्रेसने केला आहे. यासंदर्भातील पेंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका ही एकांगी असल्याचा आक्षेप राष्ट्रवादी कॉँग्रेसने आपल्या वकिलांमार्फत निवडणूक आयोगात नोंदवला आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये बंडखोरी करणाऱया अजित पवार यांनी आपणच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहोत. त्यामुळे पक्ष आणि घडय़ाळ हे निवडणूक चिन्ह आपल्याला मिळावे अशी याचिका निवडणूक आयोगापुढे केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी कॉँग्रेसची स्थापना करणाऱया शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाचं म्हणणं ऐकूण घेण्याआधीच राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचे परस्पर मान्य करत 6 ऑक्टोबरला सुनावणीस हजर राहण्याची नोटीस दोन्ही गटांना बजावली आहे.

पेंद्रीय निवडणूक आयोगाच्या या भूमिकेबाबत शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉँग्रेसने तीव्र आक्षेप नोंदविला आहे. निवडणूक आयोगापुढे होणार्या सुनावणी आधीच राष्ट्रवादीत फूट पडल्याचा निष्कर्ष कसा काय काढण्यात आला? विधिमंडळ आणि मूळ पक्ष हे वेगवेगळे असताना पक्षात फूट पडल्याचे कसे मान्य करण्यात आले? असा सवाल वकीलांमार्फत निवडणूक आयोगाला केला आहे.