विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला ‘ब्रेक’, राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा योजनेला स्थगिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणारी राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा योजना अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) या योजनेला स्थगिती दिली आहे. पुढील आदेश दिला जाईपर्यंत ही स्थगिती असेल, असे एनसीईआरटीने म्हटले आहे. त्यामुळे देशभरातील लाखो गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागणार आहे.

पेंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अर्थसहाय्याने एनसीईआरटीद्वारे शिष्यवृत्तीची राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा योजना राबवली जाते. योजनेला 31 मार्च 2021 पर्यंत मंजुरी देण्यात आली होती. पुढील अंमलबजावणीसाठी पेंद्र सरकारकडून मंजुरी मिळालेली नाही. ही योजना अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. योजनेचा सध्या आढावा घेतला जात आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देणे आणि शिष्यवृत्तीची रक्कम वाढवणे या अनुषंगाने चर्चा सुरू आहे, असे एनसीईआरटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या योजनेंतर्गत दरवर्षी राज्य आणि राष्ट्रीय अशा दोन टप्प्यांवर ही परीक्षा घेतली जाते. परीक्षेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीपासून अगदी पीएचडीपर्यंतच्या शिक्षणासाठी दरमहा शिष्यवृत्ती दिली जाते. एनसीईआरटीने या योजनेच्या स्थगितीची मुदत जाहीर केलेली नाही. त्यामुळे शिष्यवृत्तीला पात्र असलेले देशभरातील गुणवंत विद्यार्थी संभ्रमात सापडले आहेत.