निवडणुका डोळ्यासमोर ठेवत एलपीजी सिलिंडर स्वस्त; मुंबईत 19 रुपयांनी किंमत घटली

देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधून सुरू आहे. निवडणुकीत मतदारांना डोळ्यासमोर ठेवत अनेक घोषणा, आश्वासने देण्यात येतात. आता दोन टप्प्यातील मतदान झाले असून इतर टप्प्यातील मतदारांना डोळ्यासमोर ठेवत मे महिन्यात तेल कंपन्यांकडून दिलासादायक बातमी देण्यात आली आहे. तेल वितरक कंपन्यांनी सलग दुसऱ्या महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कपात केली आहे. ही कपात 19 किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात करण्यात आली आहे. त्यामुळे या सिलिंडरच्या किंमती 19 ते 20 रुपयांनी कमी झाल्या आहेत. आयओसीएलच्या वेबसाईटवर सिलिंडरच्या नव्या किमतींची माहिती देण्यात आली आहे. या किंमती 1 मे 2024 पासून लागू झाल्या आहेत.

इंडियन ऑईलने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार 1 मे पासून मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 19 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे 1717.50 रुपयांवरून घटून ती 1698.50 रुपये झाली आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये ही किंमत 1764.50 रुपयांवरून घटून 1745.50 रुपये एवढी झाली आहे. चेन्नईमध्येही व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1930 रुपयांवरून घटून 1911 रुपये झाली आहे. एप्रिल महिन्यातही या सिलिंडरच्या दरात 30 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली होती. आता सलग दुसऱ्या महिन्यात या सिलिंडरच्या किंमती घटल्या आहेत.

दैनंदिन घरगुती वापराच्या 14.2 किलो वजनाच्या गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये कुठलीही बदल करण्यात आलेला नाही. मुंबईत घरगुती वापराच्या सिलिंडरची किंमत 802.50 रुपये एवढी आहे. तर उज्ज्वला गॅस योजनेमधील लाभार्थ्यांना हा सिलिंडर 603 रुपयांना देण्यात येत आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत घट झाल्याने त्याचा सर्वसामान्यांना थेट फायदा मिळत नाही. याआधी केंद्र सरकारने महिला दिनानिमित्त या सिलिंडरच्या किंमतीत 100 रुपयांची कपात केली होती.