
सध्याचे राज्यातील तसेच केंद्रातील सरकार सत्तेचा चुकीच्या पद्धतीने वापर करीत जनसामान्यांसह शेतकरी, युवकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. महागाईने जनसामान्यांची प्रचंड होरपळ सुरू आहे.याकरीताच तुम्हाला सत्ता दिली काय,याचा जाब विचारा तसेच संधी मिळेल तेव्हा केंद्र आणि राज्यातील सध्याचे सरकार मतदानातून बदलवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी वर्ध्यातील निर्धार मेळाव्यात केले.
शरद पवार म्हणाले,आज वेगळ्या परिस्थितीत आपण एकत्र आलो आहोत, अनेकांसोबत मी बोललो, त्यावेळी त्यांच्या मनातील सरकारबद्धलची नाराजी स्पष्ट झाली. सत्तेचा गैरवापर होत आहे.शेतकरी उद्ध्वस्त होत आहेत. शेतमालाचे भाव पडत आहेत.कापसाचे भाव पडत असताना यांनी विदेशातून कापूस आणला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. महागाईने जगणे कठीण केले, पण त्याकडे सरकारला पहायला सवड़ नाही. पंतप्रधान राज्यसभेत म्हणाले, माझ्या सोबत कोणी संघर्ष करू शकत नाही.बांगला देशासारख्या लहान देशाने फळांवर आयातकर लादला,त्याला म्हणायला यांची हिंमत नाही.यालाच तुमच्या सोबत संघर्ष करायची कोणाची हिंमत नाही,असे समजायचे काय, असा खोचक टोला शरद पवार यांनी पंतप्रधानांचे नाव न घेता लगावला तसेच त्यातून देशाबाहेर यांची काय किंमत आहे,हे कळले, असेही सांगितले.
काळ्या मातीसोबत इमान राखायचे निर्णय घ्यायला सरकारला वेळ नाही. गांधीजींचा पदस्पर्श झालेला वर्धा जिल्हा,पण या जिह्यातही सगळ्यांच्याच समस्या वाढत आहेत. सत्तेचा गैरवापर तर निःसंकोचपणे सुरू आहे.अनेक विरोधकांना तुरुंगात डांबून त्याच्यावर दबाब टाकला जात आहे,त्यांच्या घरांवर छापे टाकले जात आहेत, माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या नातेवाईकांवर 130 छापे टाकले. याकरीता तुम्हाला सत्ता दिली काय,हे विचारा आणि संधी मिळेल तेंव्हा यांना जागा दाखवा,अलीकडच्या काही निवडणुकांत मतदारांनी हे दाखवून दिलेच आहे.तोच निर्धार करीत पुढील काळात पावले टाका,असे आवाहन शरद पवार यांनी केले.





























































