अलिबागमधील शिवसैनिकांचे ‘मातोश्री’वर नवान्न तोरण, 30 वर्षांची परंपरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधत अलिबागमधील शिवसैनिक व युवासैनिकांनी मातोश्रीवर जाऊन नवान्न तोरण बांधले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे हे तोरण सुपूर्द केले. गेल्या 30 वर्षांपासून ही परंपरा जपण्यात येत असून उद्धव ठाकरे यांनी त्याचे कौतुक केले.

निसर्गाबद्दल वाटणाऱया कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. गणपतीनंतर कमी कालावधीत तयार होणाऱया पिकांची कापणी केली जाते. भात हे त्यापैकी एक धान्य. नवरात्रीत नुकताच कापणी करून आणलेला भात स्वयंपाकात घेण्यापूर्वी किंवा बाजारात विकायला नेण्यापूर्वी देवाला त्याच तांदळाचा भात किंवा खीर असा नैवेद्य केला जातो, त्याची पूजा केली जाते. म्हणून दसऱयालाही भाताच्या लोंबी तोरणात अडकवून ते तोरण वैभवाचे प्रतीक म्हणून दरवाजावर बांधले जाते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 60 इंच लांबीचे भाताच्या लोंब्यांचे तोरण बांधण्यात आले. यावेळी युवासेनेचे संस्कार म्हात्रे, मयंक भगत, आर्यन मिसाळ, आश्विन गुरव, राकेश काटे, मानव म्हात्रे आदी शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.

अशी आहे पूर्वपीठिका

पक्वान्न म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे पातोळेही केले जातात. आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱया पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱया दिवशीच्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा समजले जाते. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते.