
वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर ईडीने छापा मारला नाही, बोर्डाकडे नोंदणी असलेल्या संस्थेशी संबंधित जमीन प्रकरणातील गुह्याच्या अनुषंगाने ते छापे आहेत, असे राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आज स्पष्ट केले. वक्फ बोर्डाकडे 30 हजार संस्थांची नोंदणी असून त्या सर्वांची ईडीने तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. वक्फकडील संस्थांचे व्यवहार तपासल्यास भाजप नेते व आमदार तुरुंगात जातील, असा इशाराही मलिक यांनी दिला.
वक्फ बोर्डाच्या कार्यालयावरील ईडी छाप्यांचे वृत्ताबाबत नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आल्याच्या बातम्या मुद्दाम पसरवल्या आहेत. पुण्यात ईडीचे छापे पडल्याने माझ्या अडचणी काहीही वाढणार नाहीत; उलट वक्फचे व्यवहार नीट तपासले तर भाजपचे नेते, आमदार व कार्यकर्ते तुरुंगात जातील. वक्फ बोर्डाचे काम पारदर्शकपणे सुरू आहे. बोर्डातील सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. वक्फ बोर्डाकडे 30 हजार संस्थांची नोंद आहे. ईडीने त्या सर्वांची चौकशी करावी. ईडीची कारवाई ताबूत इनाम एन्डॉमेंट ट्रस्टशी संबंधित आहे. ट्रस्टशी संबंधित पाच लोकांनी बनावट दस्तावेजाच्या आधारे जमीन संपादनाचे 7 कोटी रुपये हडप केले होते. याबाबत वक्फ बोर्डाच्या तक्रारीवरून पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात ऑगस्ट 2021 रोजी गुन्हा दाखल केला आहे, असे ते म्हणाले. राज्य सरकारने वक्फकडे नोंदणी असलेल्या सात संस्थांवर गुन्हे दाखल केले आहेत. वक्फचे कामकाज आम्ही सुधारत आहोत.
सत्यता तपासूनच वानखेडेंविरोधात कागदपत्रे सादर, नवाब मलिकांचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र
एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आपण खोटे आरोप केलेले नाहीत, त्यांच्यासंदर्भात दाखल केलेली कागदपत्रे ही खरी असून त्यांची सत्यता तपासली आहे. त्यापैकी समीर वानखेडे यांचा जन्मदाखला हा पालिकेच्या ई वॉर्डकडून मिळवला असून निकाहनामा समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीकडून मिळवला आहे, अशी माहिती मलिक यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात दिली. न्यायमूर्ती माधव जामदार यांनी मलिक यांना शुक्रवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार मलिक यांनी वकिलांमार्फत आज उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले.
ईडीचे स्वागत आहे. माझा विभाग ईडीला सहकार्य करील. पण, ईडीने कोणाच्या तक्रारीवरून कारवाई सुरू केली याची माहितीही उघड करावी.
त्यांच्यावरील ईडी कारवाई का थांबली?
अनेक नेत्यांवर ईडीने कारवाई केली होती. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावरील कारवाई थांबविण्यात आली. याची सर्व माहिती राष्ट्रवादीकडे आहे. या नेत्यांवरील कारवाईला गती का देत नाही, तपास का थांबले आहेत याचा सवाल राष्ट्रवादी ईडीला करणार आहे, असे ते म्हणाले.
गुजरात ड्रग्ज रॅकेटचे मुख्य केंद्र
गुजरातमधील द्वारका येथे सापडलेल्या ड्रग्जच्या साठय़ावरून नवाब मलिक यांनी आज भाजप व एनसीबीला पुन्हा एकदा लक्ष्य केले. ड्रग्ज रॅकेटचा सर्व खेळ गुजरातमधून सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. गुजरात आता ड्रग्ज रॅकेटचे केंद्र होऊ लागले का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
भाजपच्या मंत्र्यांशी संबंध
गुजरातच्या मुंद्रा बंदरानंतर आता द्वारकामध्ये ड्रग्ज जप्त करण्यात आले हा केवळ योगायोग आहे का? किरण गोसावी, मनीष भानुशाली, धवल भानुशाली, सुनील पाटील हे अनेकदा अहमदाबादच्या नोव्हाटेल हॉटेलमध्ये वास्तव्याला होते. हे सर्वजण ड्रग्जच्या व्यवसायात आहेत. गुजरातचे मंत्री किरीटसिंह राणा यांच्याशी या सर्वांचे जवळचे संबंध असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला. मुंद्रा पोर्टमध्ये सापडेल्या ड्रग्जचा तपास एनआयएकडे आहे. द्वारकामधील तपासही त्याच पद्धतीने होईल अशी अपेक्षा आहे. यामध्ये कोणत्या पक्षाचा नेता आहे हे लक्षात घेता एनआयए व एनसीबीने योग्य पद्धतीने तपास करावा असे मलिक म्हणाले. महाराष्ट्रात दोन-तीन ग्रॅम ड्रग्जप्रकरणी सेलिब्रेटींची चौकशी करून लोकांचे लक्ष अन्यत्र वळवून गुजरातमधील ड्रग्जचा धंदा सुरळीत सुरू राहावा अशी योजना असल्याचा संशय नवाब मलिक यांनी व्यक्त केला.
भाजपची संस्कृती
नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी नाटककार जॉर्ज बर्नाड शॉ यांच्या वाक्याचा आधार घेत जनावराची उपमा दिली होती त्याबद्दल नवाब मलिक यांनी खंत व्यक्त केली. भाजपचे नेते नेहमीच प्राण्यांची नावे देतात. त्यातून भाजपची काय संस्कृती आहे हे दिसून येते असे ते म्हणाले.
शरद पवार माझ्या पाठीशी
एनसीबीच्या संदर्भात आपण घेतलेल्या भूमिकेला संपूर्ण मंत्रिमंडळाचा पाठिंबा आहे. तसेच आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार माझ्या पाठीशी आहेत असा दावा नवाब मलिक यांनी केला. माझी ही लढाई अन्यायाच्या विरोधात असून ती पूर्णत्वास नेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे ते म्हणाले.
तुम्हाला आरसा दाखवणार
भाजपने नवाब मलिकचे पुतळे जाळले त्याचा उल्लेख करताना नवाब मलिक म्हणाले की, तुम्ही माझे कितीही पुतळे जाळा, मी तुम्हाला आरसा दाखवणार असा टोला त्यांनी लगावला.





























































