
‘देशात कोरोनाचे संकट वाढतेय. लोकांकडे पोट भरण्यासाठी पुरेसे अन्न नाहीत आणि तुम्ही पैशांची कसली उधळपट्टी करताय,’ अशा शब्दांत अष्टपैलू अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने मालदीवला ट्रीपला जाणाऱया सेलिब्रेटींवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात सध्या कडक निर्बंध लागू केले असून चित्रपट, मालिकांच्या शूटिंगवर बंदी आहे. अशातच बॉलीवूडचे अनेक सेलिब्रेटी सध्या मालदीवची ट्रीपवर आहेत. त्याचे फोटो ते सोशल मीडियावर पोस्ट करतायत. अशा सेलिब्रेटींबाबत नवाजुद्दीनने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपले मत परखडपणे व्यक्त केले आहे. तो म्हणाला, ‘ते काय बोलणार अभिनयाबद्दल? या लोकांनी तर मालदीवला तमाशा बनवून ठेवले आहे. मला नाही माहीत त्यांनी टुरिझम इण्डस्ट्रीबद्दल काय व्यवस्था केली आहे. पण माणुसकीच्या नात्याने तुमचे फोटो तुमच्याकडेच ठेवा, सोशल मीडियावर पोस्ट करू नका. इथे सगळे प्रचंड मोठय़ा अडचणींचा सामना करतायत. कोरोनाचे रुग्ण झपाटय़ाने वाढताहेत. जे लोक वाईट परिस्थितीचा सामना करत आहेत त्यांना असे फोटो दाखवून त्यांचा अपमान करू नका.’
आपण मनोरंजन करणारे लोक आहोत. बरेच लोक आपले अनुकरण करतात हे आपल्याला माहीत आहे. आपण आपली जबाबदारी योग्यरीतीने पार पाडली पाहिजे, असेही नवाजुद्दीन म्हणाला. सध्या मी बुधाना येथे माझ्या कुटुंबासोबत आहे आणि हेच माझे मालदीव असल्याचेही तो म्हणाला.

























































