
पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिलेल्या नयना पुजारी बलात्कार व हत्याकांडाची लवकरच मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना सुनावलेली फाशीची शिक्षा कायम करण्यासाठी राज्य सरकारने अर्ज केला आहे. खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठापुढे जानेवारीपासून सुनावणी सुरू होईल. फाशीवर शिक्कामोर्तब करण्याचा राज्य सरकारचा अर्ज तसेच शिक्षेविरोधातील आरोपींच्या अपिलांवर एकत्रित सुनावणी केली जाण्याची शक्यता आहे, असे अॅड. निंबाळकर यांनी सांगितले. नयना पुजारी ही सॉफ्टवेअर इंजिनीअर होती. 7 ऑक्टोबर 2009 रोजी नराधमांनी तिच्यावर बलात्कार करून हत्या केली. याप्रकरणी योगेश राऊत, महेश ठाकूर आणि विश्वास कदम या आरोपींना पुण्याच्या विशेष न्यायालयाने मे 2017 मध्ये फाशी ठोठावली होती. तिघेही सध्या येरवडा कारागृहात आहेत. या प्रकरणात राज्याच्या विधी व न्याय विभागाने नुकतीच विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती केली.


























































