सरकारने राजकीय द्वेषातून विरोधकांशी वागू नये – अजित पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र आणि राज्य सरकारच्या एजन्सींना कोणाचीही चौकशी करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. मात्र, अलीकडच्या काळात या एजन्सींचा गैरवापर होत असल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सरकारने राजकीय द्वेषातून विरोधकांशी वागू नये, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांची ईडीसह अन्य काही एजन्सींनी चौकशी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीनगर दौर्‍यावर असलेले विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, चौकशी करणे हा सरकारचा अधिकार आणि चौकशीला सहकार्य करणे, हे आपले काम आहे. मात्र, अलीकडच्या काळात विरोधकांना नामोहरम करण्यासाठी अशा चौकशा लावल्या जात आहेत. अशा प्रकरणात ज्यांना ज्यांना अटक झाली, त्यांच्याविरुद्ध एजन्सीला पुरावेही देता आलेले नाहीत. पुरावाच नसल्यामुळे खासदार संजय राऊत, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला. आज जे भाजपमध्ये गेले म्हणतात, ‘आता आम्हाला शांत झोप लागते’ यावरून सरकारच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अशा प्रकारच्या द्वेषाचे राजकारण महाराष्ट्रालाच नव्हे देशाला परवडणारे नाही, असेही अजित पवार म्हणाले.

याप्रसंगी माजी मंत्री संजय बनसोड, पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण, जिल्हाध्यक्ष कैलास पाटील गंगापूरकर व डॉ. नरेंद्र काळे आदींची उपस्थिती होती.