वाट्टेल ती किंमत मोजू; पण महाराष्ट्राला या महामारीतून वाचवणारच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘कोविड प्रतिबंधक लस, रेमडेसिविर, तसेच ऑक्सिजनवर कंट्रोल ठेवत, भाजप नेते राजकारण करीत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून, महाराष्ट्रातील रुग्ण तडफडत आहेत. मात्र, आम्हीही गप्प बसणार नाही. वाट्टेल ती किंमत मोजू; पण महाराष्ट्राला या महामारीतून वाचवणारच!’ असा ठाम विश्वास ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून, सरकार तो रोखण्यासाठी आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. एकीकडे लस, रेमडेसिविर आणि ऑक्सिजनची वारंवार केंद्राकडे आम्ही मागणी करीत आहे. तरीसुद्धा त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही; पण व्हीलचेअरवरून प्रचार करणाऱया एका महिलेला हरविण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि भाजपचे नेते फिरत आहेत. त्यांना कोरोनाची काळजी नाही.

इकडे रेमडेसिविरचा साठा केल्याप्रकरणी एका कंपनीच्या मालकाला ताब्यात घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांचे मध्यरात्री पोलीस ठाण्यात जाणे अनाकलनीय आहे. अनेक प्रयत्न करूनही सरकार अस्थिर होत नसल्याचे मुश्रीफ यांनी ठणकाविले.  

लसच नाही तर उत्सव कशाचा करणार?

लसच नाही तर उत्सव कशाचा करणार? असा सवाल करीत, ‘रेमडेसिविर आणि लसीच्या तुटवडय़ाला केंद्र सरकारच जबाबदार असल्याचा आरोपही मंत्री मुश्रीफ यांनी केला. भाजपने लस, रेमडेसिविर, ऑक्सिजनवर कंट्रोल ठेवला आहे. तरीसुद्धा महाराष्ट्र सरकार आपला प्रयत्न सोडणार नाही. आम्ही कोणतीही किंमत मोजू; पण जनतेला वाऱयावर सोडणार नाही. यापुढे तरी राजकारण थांबवून कोरोनाला रोखण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत,’ असेही त्यांनी सांगितले.