
मुंबईत शनिवारी महाविकास आघाडीचा महामोर्चा निघणार आहे. या महामोर्चाबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या की, 17 डिसेंबरला महाविकास आघाडीचा मोर्चा आहे. संपूर्ण राज्यातील लोकं मुंबईत येतील. यापूर्वी पुण्यातला मोर्चा यशस्वी झाला. तो पुण्यापर्यंत मर्यादित होता. हा संपूर्ण महाराष्ट्राचा मोर्चा आहे. अशा मोर्चात जी लोकं येतात ही उत्स्फूर्तपणे येतात. आम्हाला शिंदे गटासारखे पैसे देऊन किंवा इव्हेंट करून माणसं आणावी लागत नाहीत. महामोर्चाला येणाऱ्या तुफान गर्दीचा अर्थ भाजपनं लक्षात घ्यावा आणि बेताल वक्तव्य बंद करावीत, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
पुढे त्या म्हणाल्या की, राज्यातील बेरोजगारी, शिक्षण, थांबलेले प्रकल्प यावर तुम्ही काम करायला हवं. तुम्ही काम करत नाही आणि विनाकारण राज्याच्या राजकारणात बेताल वक्तव्य करता, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
एक बाई तुमच्यावर बोलते म्हटल्यावर कुठलीतरी डुप्लिकेट बाई उभी करायची. महिलांची इज्जत काढून हसत खेळत बसायचं, सुषमा अंधारे पाच महिन्यांपूर्वी शिवसेनेत आल्यात. ज्यावेळी सुषमा अंधारे यांची भाषणं झाली त्यावेळी वारकरी समाज कुठं होता. सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचा भंडाफोड केल्यानेच वारकरी संप्रदायातील काहींना शिंदे गटाने भडकवलं, असे त्या म्हणाल्या.
सत्ताधाऱ्यांची जिभ घसरतेच कशी. एक प्रवक्ता बोलल्यानंतर भाजपचे लोक सतत आलटून पालटून बोलतातच कसे. त्यांच्यासाठी हा मुद्दा गौण असेल. परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य आम्ही सहन करणार नाही. महापुरुषांबद्दलची बेताल वक्तव्य बंद झालीच पाहिजेत. त्यासाठीच हा मोर्चा काढण्यात येणार आहे, असे त्या म्हणाल्या.
























































