
राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. राष्ट्रवादीने ट्विटरवरून राज्यपालांचे अधोगतीपुस्तकच जारी केले असून त्यात त्यांना ढ विद्यार्थी ठरवलेले आहे. सोबत त्यांनी एक पत्र पोस्ट केले असून त्या पत्रातून त्यांनी राज्यपालांवर अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली आहे.
जनहितार्थ जारी…@BSKoshyari @BJP4Maharashtra pic.twitter.com/kvb0uk6unQ
— NCP (@NCPspeaks) February 17, 2023
राष्ट्रवादी काँग्रेसने शेअर केलेल्या अधोगतीपुस्तकात भगत सिंह श्यारी असे विद्यार्थ्याचे नाव देण्यात आले असून शाळेचे नाव व्हॉट्सअॅप विद्यालय आहे. त्यात विद्यार्थ्याची तुकडी ढ आहे. त्या विद्यार्थ्याला इतिहासात शून्य गुण मिळाले असून भुगोलात 35, नागरिक शास्त्रात 17, सामान्य ज्ञानात 34 आणि कला विषयात 100 पैकी 100 गुण मिळालेले आहेत. सोबत एक शेरा देखील जोडण्यात आलेला आहे. ”सदर विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता पाहता पालकांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. या विद्यार्थ्याची वर्तणूक पाहता याची सुरुवात बालवाडीपासून सुरू करणे योग्य राहिल” असा शेरा देण्यात आला आहे.
या अधोगतीपुस्तकासोबत व्हॉट्सअॅप विद्यालयाच्या मुख्याध्यापकांचे एक पत्रही जोडण्यात आले आहे. हे पत्र व्हॉट्सअॅप विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी ज्या दुसऱ्या शाळेत सदर विद्यार्थी जाणार आहे त्यांच्या मुख्यध्यापकाला हे पत्र लिहलेले आहे. ”पत्रास कारण की, आमच्या शाळेतील भगतसिंह श्यारी नामक विद्यार्थ्याला तात्काळ शाळेतून कमी करण्यात आले आहे. सदरहू विद्यार्थ्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे तसेच विद्यार्थ्याने सुधारणेचे कोणतेही चिन्ह न दाखवल्याने अखेर त्याची गच्छंती करण्यात येत आहे. सदरहू विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता अगदीच तोकडी असून मनोरंजनपर विषयात गती असली तरी बाकी विषयांचा अभ्यास फार कच्चा आहे. आपली जबाबदारी ओळखण्याऐवजी इतर विद्यार्थ्यांविषयी चुकीची माहिती पसरवण्याचे काम विद्यार्थ्याने केले आहे. तसेच खोडसाळपणा, नियमांचे उल्लंघन, शाळेतील शांततेचा भंग करणे आणि वाद निर्माण करणे अशी कृत्ये विद्यार्थी सातत्याने करत असतो. या वृत्तीमुळे तुमच्या शाळेतील इतर विद्यार्थ्यांवरही संगतीचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सदर विद्यार्थ्यास शाळेत प्रवेश देण्याचा विचार असल्यास वरील सर्व बाबींची गंभीर नोंद घ्यावी, ही विनंती.” असा मजकूर असलेले पत्र या ट्विट सोबत जोडण्यात आले आहे.

























































