
‘नीट यूजी’ फेरपरीक्षा नीट झाल्याचा दावा एनटीएकडून करण्यात येत असला तरीही प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे अनेक विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले आहे. विदिशामध्ये तीन विद्यार्थिनीना परीक्षा देता आली नाही. त्यामुळे एका विद्यार्थिनीच्या वडिलांना परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावरच डोके आपटून आक्रोश केला. ‘एनटीए’च्या गैरव्यवस्थापनामुळे वाया गेलेले वर्ष परत मिळणार का, असा संतप्त सवाल पालकांकडून विचारला जात आहे.
मध्य प्रदेशच्या विदिशा येथील एका केंद्रावर दोन विद्यार्थिनींना केवळ दोन मिनिटांचा विलंब झाला म्हणून प्रवेश नाकारण्यात आला. सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला, मात्र विदिशामध्ये राहणारी स्नेहा दुबे आणि कुरवाई तालुक्यातून आलेली रागिनी विश्वकर्मा या सुमारे दोन मिनिटे उशिरा पोहोचल्या. वाहन पंक्चर झाले आणि पावसामुळे त्यांना उशीर झाला, असे त्यांनी नोडल अधिकाऱ्यांना सांगूनही काही फायदा झाला नाही.
n रागिनी ही वडिलांसह 70 किमी अंतरावरून पोहोचली होती, मात्र तिला परीक्षा न देता आल्याने तिने गेटवरच हंबरडा फोडला. तिचे वडील हात जोडून विनवणी करत होते. एक वेळ तर त्यांनी प्रवेशद्वारावरच डोके आपटले. त्यांचा आक्रोश पाहून तेथे उपस्थित असलेले सर्वजण हळहळले.
कुणी धरले पाय तर कुणी जोडले हात, नियमांचा फटका विद्यार्थ्यांनाच बसला
अवघ्या एका मिनिटामुळे परीक्षेला बसू दिले नाही
तेलंगणाच्या मेडचल जिह्यातही अवघे 1-2 मिनिटे उशिरा पोहोचल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला. आपल्या मुलीचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून वडिलांनी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांचे पाय धरले. मात्र, या विद्यार्थिनीला प्रवेश देण्यात आला नाही. हैदराबादमधील एक महिला चक्क सुरक्षा रक्षकांच्या पाया पडली. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
बिहारमध्ये सॉल्व्हर गँगला अटक
बिहारच्या लखीसरामध्ये नीट फेरपरीक्षेत डमी विद्यार्थी बसवणाऱ्या गँगच्या 24 जणांना अटक करण्यात आली आहे. डमी विद्यार्थी बसवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून 30 ते 40 लाख रुपये घेण्यात आले होते, असे तपासात उघडकीस आले आहे. या रॅकेटमध्ये बायोमेट्रिक तपासणी करणाऱ्या 14 कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. अर्पित राज हा या गँगचा म्होरक्या आहे.
गुगल मॅपमुळे दोघांची परीक्षा हुकली
गुगल मॅपवर पाहून नीटचे सेंटर गाठणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना गुगल मॅपने धोका दिला. गुगल मॅपने चुकीचे लोकेशन दाखवल्याने या दोन विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत न पोहोचता आल्याने त्यांची परीक्षा हुकली. या दोन्ही मुलांनी नीट परीक्षेसाठी खूप अभ्यास केला होता, परंतु गुगल मॅपच्या एका चुकीमुळे या 2 विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले आहे. यामुळे या विद्यार्थ्यांच्या कुटुंबासह गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
































































