आता सावकारी करावी लागणार ‘चेक’ने,केवळ 20 हजार रुपयांपर्यंत रोख रक्कम देता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,मुंबई

सावकारी व्यवसायातून काळ्या पैशाला मिळणारी चालना थांबवण्यासाठी सहकार विभागाने कंबर कसली आहे. त्यानुसार नोंदणीकृत सावकारांनी 20 हजार रुपयांपर्यंतचाच व्यवहार रोखीने करावा. त्यापेक्षा मोठा व्यवहार असेल तर चेक किंवा इतर कायदेशीर बाबींचा अवलंब करण्याचे आदेश सावकारी निबंधक (सावकारी) यांनी दिले आहेत. त्यामुळे आतापर्यंत रोखीने व्यवहार करणाऱ्या सावकारांचे धाबे दणाणले आहे.

राज्यातील नोंदणीकृत सावकारींची  संख्या  दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यांचे व्यवहारही लाखो रुपयांचे आहेत. मात्र सावकारांकडून कार्जाऊ दिली जाणारी रक्कम रोखीने दिली जाते. या रोखीच्या व्यवहारामुळे आयकर विभागाच्या कायद्याचे उल्लंघन होत आहे. तसेच कोणत्या सावकाराने कर्जदारास किती रक्कम दिली याचेही कायदेशीर रेकॉर्ड राहत नाही. तसेच वसुली करताना कर्जदाराची पिळवणूक होते. त्या पार्श्वभूमीवर 20 हजार रुपयांचेच व्यवहार रोखीने करावेत. त्यापेक्षा मोठी रक्कम द्यायची असल्यास चेकने द्यावेत असे लेखी आदेश सहकार निबंधक (सावकारी) यांनी काढले आहेत. त्यामुळे सावकारांचे सर्व मोठे व्यवहार रेकॉर्डवर येणार आहेत. सावकाराने चेकने कर्जदाराला कर्जाची रक्कम दिल्यास वसुलीच्या वेळीही तो अवाच्यासवा रकमेच्या वसुलीसाठी तगादा लावू शकत नाही. या आदेशाचे पालन न करणाऱ्या सावकारांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.