
मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असताना तब्बल 20 हजार ठिकाणी डेंग्यू, मलेरिया पसरवणारे डास आढळले आहेत. हे आजार रोखण्यासाठी पालिकेने डेंग्यू प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या 45 लाख 37 हजार 247 ठिकाणी झाडाझडती घेतली असता 18 हजार 052 ठिकाणी डेंग्यू पसरवणारा ‘एडीस’ डास सापडला. तर मलेरिया उत्पत्ती होणाऱ्या 2 लाख 12 हजार 541 ठिकाणी तपासणी केली. यामध्ये मलेरियाचा प्रसार करणाऱ्या एनोफिलीस डासाची 2214 उत्पत्तीस्थाने आढळली. त्यामुळे मुंबईकरांनी घर आणि परिसराची स्वच्छता राखावी, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
पावसाळ्यात प्रसार वाढणाऱ्या डेंग्यू, मलेरियाला आळा घालण्यासाठी पालिकेकडून वर्षभर घरोघरी, आस्थापनांच्या ठिकाणी भेटी देऊन डासांची उत्पत्तीस्थाने शोधली जातात. या तपासणीत डेंग्यू, मलेरिया निर्माण करणारी डासांची ठिकाणे सापडल्यास नष्ट केली जातात. ‘एडिस इजिप्ती’ हा डेंग्यू तर ‘ऍनॉफिलीस स्टिफेन्सी’ हा मलेरिया फैलावण्यास कारणीभूत ठरतो. या पार्श्वभूमीवर मलेरियास कारणीभूत ठरणाऱ्या विहिरी, पाण्याच्या टाक्या, तरण तलाव आदी ठिकाणी तपासणी झाली. पाण्याची पिंपे, टायर, भंगार, पेट्री लेट्स, फेंगशुई झाडे, मनी प्लांट अशी ठिकाणे तपासण्यात आली. 31 मेपर्यंत 20 हजारांहून अधिक जागी डेंग्यू-मलेरिया पसरवणाऱ्या डासांची ठिकाणे सापडली. डेंग्यू उत्पत्ती करणारी 18052 छपरावरील ठिकाणे व 2624 टायर्स आणि 126437 ऑड आर्टिकल्स पालिकेच्या माध्यमातून हटवण्यात आली.
डासांची उत्पत्तीस्थाने ठरतात घातक
एक मादी डास 100 ते 150 अंडी घालते. एका मादी डासाचे सरासरी आयुष्य हे 3 आठकडय़ांचे असते. या तीन आठवडय़ांच्या कालावधीत मादी डास किमान 4 वेळा साचलेल्या पाण्यात अंडी घालते. म्हणजेच एका मादी डासामुळे साधारणपणे 400 ते 600 डास तयार होत असतात. पावसाळ्यापूर्वी व पावसाळय़ादरम्यान पाणी साचलेल्या ठिकाणांची संख्या वाढते.
कोरडा दिवस पाळा
साचलेल्या पाण्यात डासांच्या विविध अवस्था या साधारणपणे आठ दिवसांपर्यंत असतात. त्यामुळे घर-परिसरात साठवलेले किंवा साचलेले पाणी सात दिवसांपेक्षा अधिक काळ राहणार नाही, याची काळजी घ्यावी. यासाठी आठवडय़ातून किमान एक दिवस ही भांडी कोरडी ठेवून, आतूनही कपडय़ाने पुसून घ्यावीत, असे आवाहन पालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
पावसाळा तोंडावर आल्यामुळे घर व परिसरात पाणी साचू देऊ नये. पालिकेच्या तपासणीत निर्देश देऊनही दुर्लक्ष केल्यास न्यायालयाच्या निर्देशानंतर 2 ते दहा हजारांचा दंड, नोटीस अशी कारवाई होते. त्यामुळे मुंबईकरांनी स्वतःच्या आणि इतरांच्या काळजीसाठी स्वच्छता राखली पाहिजे.
राजन नारिंग्रेकर, कीटनाशक विभागप्रमुख

























































