सरत्या वर्षाला निरोप, नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणातील समुद्रकिनारे गर्दीने फुलले

सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी रत्नागिरी जिल्हातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी जमली आहे. हॉटेल्स, लॉज आणि रिसॉर्टस हाऊसफुल्ल झाली आहेत. नवीन वर्षाच्या स्वागताची हॉटेल व्यावसायिकांनीही जय्यत तयारी करताना विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. स्थानिक मंडळींनीही थर्टीफर्स्ट साजरा करण्यासाठी आपले बेत आखले आहेत.

थर्टी फर्स्टसाठी गोव्यापेक्षा कोकण किनारपट्टीला पर्यटकांची जास्त पसंती मिळत आहे. गणपतीपुळे, वेळणेश्वर, हर्णे, मुरुड याठिकाणी पर्यटकांची गर्दी पहायला मिळत आहे. गणपतीपुळे समुद्रकिनारा पर्यटकांनी बहरून गेला आहे. सकाळपासूनच पर्यटकांनी समुद्रात डुंबण्याचा आनंद घेतला. त्याचबरोबर वॉटरस्पोर्टसचाही थरार अनेक पर्यटकांनी अनुभवला. पर्यटकांच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स सज्ज झाली आहेत. थर्टीफर्स्टसाठी हॉटेल व्यावसायिकांनी खास मेनू तयार ठेवत पर्यटकांना आकर्षित केले आहे. शनिवार असल्यामुळे अनेकांनी रात्री बारा वाजल्यानंतर नवीन वर्षाच्या स्वागताला मांसाहार करण्याचा बेत आखला आहे. अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार असून विविध संगीतमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक मंडळींनीही थर्टीफर्स्टची जोरात तयारी केली आहे. पिकनिकस्पॉटची निवड करत त्याठिकाणी थर्टीफर्स्ट साजरा करण्याचे बेत आखले गेले आहेत.

थर्टीफर्स्टच्या जल्लोषावर पोलीसांची करडी नजर आहे. साध्या वेशातील पोलीस दारु पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांवर लक्ष ठेवणार आहेत. त्याचबरोबर थर्टीफर्स्टच्या जल्लोषावर व्हिडीओ कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. जिल्ह्यात 34 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून दारु पिऊन वाहन चालवणाऱ्यांची तपासणी सुरु आहे. उत्पादनशुल्क विभागही सतर्क झाला असून मद्यवाहतूक आणि मद्यविक्रीवर करडी नजर ठेवून आहे. त्यांची चार पथके तैनात ठेवण्यात आली आहेत.