उरण नगर पालिकेचे कूपनलिकांकडे दुर्लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। न्हावाशेवा

उरण शहरातील रहिवासियांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी उरण नगर पालिकेने लाखो रुपये खर्च करून काही ठिकाणी कूपनलिकाची उभारणी केली आहे. परंतु उरण शहरवासीयांना पाणी पुरवठा करणाऱ्या या कूपनलिकांकडे लक्ष देण्यास  उरण नगर पालिकेच्या प्रशासनाला वेळ मिळत नसल्याने आज लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या कूपनलिकांची दुरावस्था झाली आहे.

वाढत्या औद्योगिकरणामुळे, नागरिकरणामुळे उरण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणामधील पाण्याची पातळी दरवर्षी खालावत असल्याने येथील रहिवाशांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.यावर उपाययोजना करण्यासाठी उरण नगर पालिकेने शहरातील तलावांचे,विहिरीचे संवर्धन,जतन करण्याचे काम हाती घेतले. तसेच शासनाकडून मिळालेल्या अनुदानातील लाखो रुपये खर्च करून शहरातील काही भागात कूपनलिकांची उभारणी केली.

परंतु सध्या उरण नगर पालिकेने शहरातील कूपनलिकाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने आज या कूपनलिका बंद पडून कचऱ्याच्या अडगळीत पडलेल्या आहेत. तरी उरण शहरात उद्भवणारी पाण्याची समस्या दूर करण्यासाठी अडगळीत पडलेल्या या कूपनलिकांचे संवर्धन आणि जतन करून त्यांचे पाणी इतर कारणांसाठी वापरात आणावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.