
दादर पूर्व टीटी परिसराची आता पाणी साचण्यातून सुटका होणार आहे. या भागातील 20 पर्जन्य जलवाहिन्यांचे काम अंतिम टप्प्यात आल्यामुळे पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता दुप्पट होणार आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे हजारो रहिवाशांची गैरसोय दूर होणार आहे.
दादर पूर्व येथील ‘दादर ट्राम टर्मिनस’ परिसरात अतिवृष्टी झाल्यास अनेक वेळा पाणी साचण्याचे प्रकार घडतात. अनेक तास या भागांत पाणी साचून राहत असल्यामुळे या भागातून जाणारी वाहने, नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून दादर टीटी आणि लगतच्या भागातील 20 पर्जन्यजल वाहिन्यांचे पुनर्बांधकाम व सक्षमीकरण 2018 पासून सुरू करण्यात आले आहे. यामध्ये 9 हजार 153 फूट लांबीच्या 20 पर्जन्य जलवाहिन्यांपैकी 8 हजार 464 फूट लांबीच्या 19 पर्जन्य जलवाहिन्यांची कामे आता अंतिम टप्प्यात असून ती येत्या पावसाळ्यापू्र्वी होणार आहेत. या पर्जन्य जलवाहिन्यांचे काम सुधारित आराखडय़ानुसार केल्याने त्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता दुपटीने वाढणार आहे.





























































