
सामना प्रतिनिधी । नगर
जिल्ह्यात कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळाचा फटका रब्बी हंगामाला बसला आहे. पाण्याच्या टंचाईमुळे या हंगामात पेरण्या कमी झाल्या आहेत. डिसेंबर महिना अखेरपर्यंत जिल्ह्यात अवघ्या 37 टक्के पेरण्या झाल्या आहेत. हंगामातील मुख्य पिक असलेल्या ज्वारीच्या एक लाख 88 हजार हेक्टर आणि गव्हाच्या 22 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.
राज्यात कमी पावसामुळे दुष्काळी स्थिती आहे. राज्य सरकारने राज्यातील जवळपास दीडशे तालुके आणि 268 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे. नगर जिल्ह्यातही दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे खरीप हंगामानंतर रब्बी हंगामालाही फटका बसला आहे. रब्बी हंगामात आतापर्यंत अवघ्या 37 टक्के म्हणजेच दोन लाख 45 हजार 329 हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यातील 6 लाख 67 हजार हेक्टरवर पेरण्या होतील, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता; परंतु, दुष्काळामुळे निम्म्याही पेरण्या झालेल्या नाहीत. त्यामुळे रब्बीतही उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात आतापर्यंत मका 3 हजार 846 हेक्टर, तर हरभरा 30 हजार 161 हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. या व्यतिरिक्त काही ठिकाणी ऊसाची लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात जवळपास 44 हजार 149 हेक्टवर ऊस लागवड करण्यात आली आहे; तसेच 55 हजार 875 हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड करण्यात आली आहे.

































































