
पदार्थातील इलेक्ट्रॉनच्या गतिशीलतेच्या अभ्यासासाठी प्रकाशाची अॅटोसेकंद स्पंदने निर्माण करणाऱया प्रायोगिक पद्धतींचे संशोधन, पियरे अगोस्टिनी, फेरेंक क्राउझ आणि अॅन लहुलियर या तिघांना यंदाचे पदार्थविज्ञानातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. अणू-रेणूंमधील इलेक्ट्रॉन कणांची संरचना आणि वावर समजून घेण्यासाठी नव्या विश्लेषण पद्धती शोधण्यासाठी या त्रिमूर्तीने दिलेल्या योगदानाचा हे पारितोषिक देऊन सन्मान करण्यात येत असल्याचे रॉयल स्विडीश अकादमी ऑफ सायन्सेसने म्हटले आहे. त्यांच्या या पद्धतींमुळे इलेक्ट्रॉनच्या हालचाली आणि ऊर्जास्वरूप बदलण्याच्या वेगवान प्रक्रियांचे मापन शक्य झाले आहे, असे अकादमीने म्हटले आहे.