
OLX वर जुनी गाडी घेताय? थोडं थांबा आणि ही बातमी वाचा. कारण नोएडाच्या सेक्टर-24 पोलिसांनी एकच चारचाकी गाडी OLX वरून 12 जणांना विकणाऱ्या भामट्याला अटक केली आहे. सेक्टर-22 मधून त्याला अटक करण्यात आली असून त्याच्या कडून कार, बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
याबाबत एसीपी रजनीश वर्मा यांनी सांगितले की, अटक केलेल्या आरोपीचे नाव मनोत्तम त्यागी उर्फ मनु त्यागी असे आहे. तो मूळचा तिगडी गावचा रहिवासी आहे. त्याच्या ताब्यातून बनावट नंबर प्लेट लावलेली वैगनआर कार, दोन मोबाईल फोन, बनावट आधार, पॅन कार्ड आणि 10 हजार 720 रुपये रोख जप्त करण्यात आले.
जप्त केलेली कार आरोपीच्या मुरादाबाद येथील मित्राची आहे. त्याच्यावर उत्तर प्रदेश, उत्तराखंड राज्यात फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत. तसेच नोएडाच्या सेक्टर 30 मध्ये हत्या आणि दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.
अशी करायचा फसवणूक
आरोपी मित्राची गाडी स्वस्तात विकायचा. गाडी विकण्यापूर्वी त्याची डुप्लिकेट चावी बनवून जीपीएस लावायचा. जीपीएसच्या सहाय्याने गाडीचे ठिकाण त्याला कळायचे. संधी मिळताच तो गाडीची चोरी करून फरार व्हायचा.
परत तीच गाडी तो इतर व्यक्तीला विकायचा आणि पुन्हा चोरी करायचा. अशा पद्धतीने मित्राची वैगनआर कार तब्बल 12 जणांना विकली. टोकन घेऊन खरेदीदाराला कागदपत्रांची फोटो कॉपी देऊन तो फरार व्हायचा.
असा अडकला जाळ्यात
सेक्टर 117 मधील रहिवासी जिते यादव हे सेक्टर 12 मधील कार बाजारात जुन्या गड्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. काही दिवसांपूर्वी आरोपीने त्यांना एक स्विफ्ट कार 2 लाख 70 हजारांना विकली होती. नंतर कार त्यांच्या नावावर ट्रान्सफर झाली नाही. तीच कार त्यांनी OLX वर विक्रीसाठी असल्याचे पाहिले तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचे कळले. त्यांनी आरोपीशी फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र फोन लागला नाही. अखेर त्यांनी सेक्टर 24 पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला सेक्टर 22 मधून अटक केली.
























































